Resignation : राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली. शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. याच पृष्ठभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोलेंनी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘भाजपने निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे पत्र आणावे. आम्ही सुरुवात स्वतःपासून करू आणि 100 टक्के बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तयार आहोत.’ ‘नाना पटोलेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरची मागणी करावी’, असे प्रत्युत्तर माजी राज्यमंत्री, आमदार डॉ परिणय फुके यांनी पटोलेंना दिले आहे.
डॉ. फुकेंच्या प्रत्युत्तर देताना पटोलेंनी राजीनाम्याची तयारी असल्याचे जाहीर करत भाजपला आव्हान दिले आहे. पटोले म्हणाले की, ‘बॅलेट पेपरवरील मतदान ही फक्त राजकीय मागणी नाही, तर लोकशाहीचा मूलभूत हक्क आहे. माझं मत सुरक्षित राहणं ही माझ्या व्यक्तिमत्वाच्या सुरक्षिततेची खात्री आहे. ग्रामीण भागात सध्या भागवत सप्ताह सुरू होत आहेत. या कार्यक्रमांमध्ये ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या’ ही स्वाक्षरी मोहीम चालवली जावी.’
नाना पटोले यांनी ही मोहीम राजकीय नसून लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी असल्याचे सांगितले. माझ्या मताचा उपयोग योग्य पद्धतीने होईल, याची खात्री असायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे, असे पटोलेंनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पटोलेंनी बॅलेट पेपरसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
पटोलेंच्या या मागणीला भाजपने फारसा प्रतिसाद दिलेला नसला तरी शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पटोलेंच्या आक्रमक भूमिकेने राजकीय वातावरण तापले आहे. ही मागणी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने असल्याचे पटोलेंचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.