महाराष्ट्र

Congress : महाविकास आघाडीचे ठरले; साकोलीत नाना पटोले तर तुमसरात चरण वाघमारे

Assembly Election : काँग्रेस,शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत नाव जाहीर

Nana Patole : महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गुरुवारी 24 ऑक्टोबरला रात्री यादी घोषित केली. काँग्रेसचे 48 तर शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी आहे. त्यात अपेक्षेनरुप साकोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली आहे. विलंब का होईना तुमसरात अखेर तुतारी कडून चरण वाघमारेंच्या नावाची घोषणा झाली आहे.

राजकीय पक्ष सक्रिय

नाना पटोले यांची साकोलीतून उमेदवारी आधीपासूनच पक्की मानली जात होती. जिल्ह्यातील साकोलीसह भंडारा आणि तुमसर या तिनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यापैकी साकोली आणि तुमसर या दोन मतदारसंघांत उमेदवारीची घोषणा झाली असली तरी भंडारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

चरण वाघमारे यांनी गेल्या पंधरवाड्यात मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्या या प्रवेशापासनच येथील महाआघाडीचे तिकीट त्यांना पक्के असल्याचे मानले जात होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरातून प्रचंड विरोध सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुंबईत जाऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून ही उमेदवारी जाहीर केलीच.

काँग्रेस -शरदपवार गटातील आपसी वाद

भंडारा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील उमेदवारीवरुन बराच अंतर्गत वाद सुरु आहे. येथील उमेदवारी बुध्दीष्ट व्यक्तीलाच द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला असून तयारी चालविली आहे. पहिल्या यादीत भंडाराचा समावेश राहील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने भंडाऱ्यात उमेदवारीबाबत काय घडणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दूसरीकडे विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चरण वाघमारे यांना शरद पवार गटाच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा विरोध असला तरी उमेदवारीचा अखेरपर्यंत फेरविचार झालाच नाही. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे नाराज नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याची माहिती आहे.

नाटक

महाविकास आघाडीत मात्र राजकीय नाट्य बघावयास मिळत आहे. काँग्रेस व शरदचंद्र पवार गटातील स्थानिक नेत्यांचा चरण वाघमारे यांना विरोध कायम आहे. वाघमारे यांचा नामांकन अर्ज भरण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे येणार असून त्या नेत्यांची नाराजी दूर करतील, अशी शक्यता आहे. वाघमारे यांच्याकडून नामांकन दाखल करण्याची तारीख ठरायची आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!