Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला. परंतु कार चालकाची अवघ्या पंधरा तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर आहे. गरीब व श्रीमतांना वेगळे कायदे असल्याचे यातून स्पष्ट दिसते. कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सहज सुटका झाली. हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना न्याय नाकारणारे आहे. संपूर्ण घटनाक्रम पाहता पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
18 मे च्या रात्री उशीरा पुण्यात भीषण अपघात झाला. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचं निधन झालं. यावरून वातावरण पेटलेलं आहे. आता या अपघाताच्या चौकशीला वेग आला आहे.
या घटनेतील आरोपीला अटक झाली पण अवघ्या काही तासांत त्याला जामीनही मिळाला. यामुळे संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जामीन देताना न्यायालयाने त्याला दिलेल्या शिक्षेबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या आरोपीला शिक्षा काय तर अपघात या विषयावर निबंध लिहा. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन आरोपी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून या अपघातात मृत झालेले दोघे राजस्थानचे आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपी ॲड. प्रशांत पाटील यांच्यातर्फे जामीनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने तो मंजूर करत त्याला काही अटींवर जामीन दिला.
आरोपीची वैद्यकीय चाचणी केली का?
अपघातानंतर एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये होता अशी माहिती समोर आली? राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला भेट देतात व खुलासे करतात. ज्या घटनेशी भाजपाचा संबंध असतो तिथे तिथे फडणवीस तातडीने जातात. पूर्व काळातही अशाच काही घटना घडल्या.
या सर्व गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या आहे. फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांनी आरोप केले. आणि या घटनेची तात्काळ चौकशी करावी असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.