Congress : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं दिपोत्सव साजरा केला आहे. नाना पटोले यांनी संविधानापुढं मेणबत्ती लावत प्रार्थना केली. यावेळी आमदार पटोले यांनी संविधानाबद्दल भावनाही वक्त केल्या. समाजातील सर्व लोकांना समान हक्क देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिले. विद्यमान सरकार पावलोपावली संविधानाची पायमल्ली करताना दिसत असल्याचं पटोले प्रार्थना करताना म्हणाले. दिवाळी अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा सण आहे. प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक दिवा संविधानासाठी लावत असल्याचं पटोले यावेळी म्हणाले.
संविधानाच्या रक्षणासाठी..
संविधानासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी, राज्यातील महाभ्रष्ट युतीची जुलमी राजवट हटविण्याची शपथ घेऊ या, असं आवाहन यावेळी पेटोले यांनी केलं. पांढरा कुर्ता, पायजामा आणि डोक्यावर गांधी टोपी असा नाना पटोले यांचा पहेराव होता. त्यानंतर त्यांनी या प्रार्थनेचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यानंतर नाना यांच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला. महायुती सरकारच्या समर्थकांनी पटोले यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकांनी दलित, मुस्लिम आणि मराठा हे समीकरण महाविकास आघाडीच्या पाठिशी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रचंड व्हायरल
नाना पटोले यांचा संविधान प्रार्थनेचा व्हिडीओ काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओला नऊ हजारावर व्ह्यू मिळाले. परंतु त्यापेक्षाही दुप्पट कमेंटचा पाऊस या पोस्टवर पडला. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी आणि काँग्रेसनं संविधान धोक्यात असल्याचा प्रचार केला होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मतदारांनी भाजपकडं पाठ फिरवली. त्याचा फटका महाराष्ट्रात भाजपला बसला. विशेषत: विदर्भात तर भाजपची पिछेहाट झाली. यंदा पुन्हा काँग्रेस संविधानाच्या विषयावर बोलत आहे. वंचित बहुजन आघाडीनंही हा धोका व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे वक्तत्व
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तर विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार असल्याचं जाहीर वक्तव्यच केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत संविधान, आरक्षण हे मुद्दे चर्चिले जाणार आहेत. महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून रणकंद सुरू आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, मुस्लिम समाज आरक्षणाबाबत आक्रमक आहेत. तूर्तास आचारसंहिता असल्यानं हा मुद्दा शांत आहे. परंतु निवडणुकीत आरक्षणाचा विषय निर्णायक ठरणार आहे. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं संविधान पूजन काहींना नाटक वाटत आहे, तर काहींना धोक्याची घंटा. त्यातून किती मतदार काँग्रेसला साथ देतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास नाना पटोले यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.