Lok Sabha : कुस्तीत महिलांच्या 50 किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे पदक निश्चित झाले असे वाटत असतानाच ही कारवाई झाली आहे. 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. विनेशचे वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त भरले. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर इकडे भारतात खळबळ उडाली. राजकीय वातावरण तापले. काँग्रेसने लोकसभेत यावर चांगलाच गोंधळ घातला. लोकसभेत विरोधकांनी गदारोळ करत याप्रकरणी क्रीडा मंत्र्यांना उत्तर मागितले. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र ठरल्याने भारताला धक्का बसल्याचे काँग्रेसने नमूद केले. क्रीडामंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे असे म्हणत विरोधकांनी लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला. क्रीडा मंत्री उत्तर द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यामागे नेमके काय कारण आहे? अशी विचारणा विरोधकांनी केली.
विरोधकांचा राडा
लोकसभेत समाजवादी पार्टीचे खासदार बीरेंद्र सिंग बोलायला उभे राहिले, तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विनेश अपात्र ठरली ही भारतीय संघासाठी अतिशय निराशाजनक आणि दुर्दैवी गोष्ट आहे, असे पत्रक भारतीय ऑलिम्पिक समितीने प्रकाशित केले. भारतीय चमूने रात्रभरात विनेशचे वजन नियंत्रणात असावे म्हणून पूर्ण प्रयत्न केले. मात्र सकाळी झालेल्या वजन चाचणीत विनेशचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा 100 ग्रॅम जास्त भरले. विनेशच्या खासगीपणाचा अधिकार जपावा, अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने यावेळी केली. इकडे लोकसभेत विनेश फोगाटबाबतचा मुद्दा उपस्थित करत प्रचंड गदारोळ झाला. यावर आता क्रीडामंत्री उत्तर देणार आहेत.
या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) विनेशचे प्रशिक्षक महावीर सिंह यांच्यापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केंद्र सरकारकडे त्यांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. हा विनेश फोगटचा नव्हे तर भारताचा अपमान आहे. विनेश जगभरात मोठा इतिहास रचणार होती. भारत सरकारने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. ऑलिम्पिक समितीने ऐकले नाही तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा, असे शिंह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर म्हणाले, विनेश तू भारताचा गौरव आहेस. याशिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुला अपात्र ठरविले जाणे हे फार वेदनादायी आहे. आव्हान स्वीकारणे हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला आहे. तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत. विनेशला अपात्र करणे हा षडयंत्राचा भाग असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हिंदकेसर दीनानाथ सिंग यांनी यावर मत व्यक्त केले आहे. अर्धाग्लास पाणी जरी प्यायलात तर अर्धा किलो वजन वाढते, असे ते म्हणाले.