Toll Issue : कोल्हापूर-पुणे, पुणे-सातारा महामार्गासंदर्भात काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुस्थितीत येईपर्यंत 25 टक्के टोल सवलत देण्यात येणार आहे. 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहन धारकांना टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. 50 टक्के टोल सवलत देण्याचा प्रस्ताव एक महिन्यात केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी हे आंदोलन केले.
कोल्हापूर-पुणे महामार्गावरून हे आंदोलन करण्यात आले. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोलमाफी करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी होती. त्यामुळे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापूर या चारही टोल नाक्यांच्या ठिकाणी काँग्रेसने एकाच वेळी आंदोलन केले. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर सर्व्हिस रोडवरील खड्डे 15 दिवसात बुजविण्यात येतील, असे सांगितले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन घेण्यात आले.
आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नाइकवडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चव्हाणांचाही ठिय्या
सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावरही आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तासवडे येथे आंदोलन केले. आणेवाडी टोलनाक्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी आंदोलन केले. यावेळी चव्हाण म्हणाले की, खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्र सरकारने दोन ठेकेदारांना कंत्राट दिले आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा नाही. अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे, असा प्रश्न त्यांनी केला. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू आहे. कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे.
महामार्गाचा ठेका डी.पी. जैन यांना दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नाही. याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे. आमदार विश्वजित कदम, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवराज मोरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर आमदार संग्राम थोपटे यांनी आंदोलन केले. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गाची दुरवस्था झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बाठ दिवसात खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.