Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात काँग्रेसकडून जय्यत तयारी केली जात आहे. इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटप फिस्कटली तर ‘प्लॅन बी’ म्हणून तयारी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात महत्वाच्या मतदारसंघावरही काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला पूर्वसाठी काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल अवघ्या काही महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी आघाडी आणि युतीमधील घटकपक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघावर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) गटासह आता काँग्रेसही दावा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. स्थानिक काँग्रेस पक्ष कार्यालयातून अनेक इच्छुकांनी अर्ज घेतला आहे.
दाव्यामागील कारण..
अकोला पूर्व मतदारसंघ गेनी अनेक वर्ष काँग्रेसकडेच होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे हा मतदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाऊ शकतो, अशी जिल्ह्यात चर्चा आहे. अशात आता काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा होऊ शकतो. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाची शहरी व ग्रामिण अशी रचना आहे. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. पूर्वी शिवसेनेचा हा मतदारसंघ गड मानला जायचा. शिवसेनेतरन फुटीनंतर ठाकरेंची शिवसेना आता महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. अशात जागा वाटपात हा मतदारसंघ कुणाला हा सुटतो हे पाहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha)भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी जोरदार टक्कर दिली. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढलेली दिसली. या ताकदीमागे अनेक कारणे आहेत. लोकसभा निवडणुकीत चांगले मतदान मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. अकोला पूर्वमधून काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे, राज्याचे प्रवक्ता कपिल ढोके, राजेश मते आदींनी अर्ज घेतले आहेत.
व्यूहरचना तयार
राज्यात काँग्रेसची ताकद लोकसभा निवडणुकीत वाढली. त्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत जास्त जागांची मागणी आगामी केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने सर्वच मतदारसंघात स्वबळाची तयारी करीत आहे. मनासारखे जागावाटप झाले नाही, तर काँग्रेस ‘प्लॅन बी’नुसार स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे स्पर्धा राहणार हे निश्चित आहे. जोपर्यंत वाटाघाटी अंतिम होत नाही, तोपर्यंत चर्चा कायम राहणार आहे. पण विदर्भातील अनेक जागा मागण्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार आहे. काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त जागा जिंकलेला काँग्रेस हा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.