महाराष्ट्र

Assembly Election : राहुलसोबत प्रियंकाही उतरणार महाराष्ट्राच्या मैदानात

Congress : महाराष्ट्र जिंकण्यासाठी सभांचे प्लॅनिंग सुरू

War For Maharashtra : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मेगा प्लानिंग तयार करण्यात येत आहे. यंदा काँग्रेस राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनाही पूर्ण ताकदीने राज्याच्या प्रचारात उतरविण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये सध्या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर ही दोन नावे आहेत. त्यानंतर मल्लीकार्जुन खर्गे यांचा क्रमांक आहे. निवडणूक काळात कोणत्या मुद्द्यांवर बोलयाचे किंवा कोणत्या मुद्द्यांना महत्व द्यायचे याचा अजेंडाही ठरत आहे.

सद्य:स्थितीत सगळ्यात मोठा प्रश्न आरक्षणाचा राहणार आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, मुस्लिम या आरक्षणावर जास्त लक्ष दिले जाणार आहे. मालवण राजकोटमधील पुतळ्याचा विषय त्यानंतर घेतला जाणार आहे. यातून शिवप्रेमींमध्ये सरकार विरोधात असलेल्या रोषाला हवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यभरातील बालिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दाही घेतला जाणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे महायुतीमधील तीन प्रमुख नेते महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पूर्णवेळ टार्गेट राहणार आहेत. त्यासंदर्भातील सुरुवातही करण्यात आली आहे.

विभागनिहाय मुद्दे

निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेत्यांना विभागनिहाय मुद्द्यांवर बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्हा, शहर अगदी गाव पातळवरील मुद्द्यांना हात घालण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व सभांमध्ये आतापर्यंत मोदी-शाह आणि फडणवीस यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कसे डावलले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंकजा मुंडे यांच्यावर आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा पाढाही आघाडीचे नेते वाचणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काही नेत्यांचा पत्ता कापण्यात आला. आता त्यापैकी काहींना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे. या नेत्यांनी सत्तेसाठी आपले डिमोशन कसे करवून घेतले असे मतदारांना पटवून देण्यात येणार आहे. यात भावना गवळी, हंसराज अहीर, कृपाल तुमाने या नेत्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धोका देणाऱ्या गद्दार आमदार अशा ‘टॅगलाइन’खाली अमरावतीत आमदार सुलभा खोडके यांचा समाचार घेण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.

केवळ आरोप नसतील

लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीतील नेते यंदा महायुतीमधील नेत्यांवर प्रक्षोभक बोलताना क्वचितच दिसतील. मुद्देसूद, पुरावे, कागदपत्र, व्हिडीओच्या आधारावर भाषणं करण्याचा सल्ला नेत्यांना देण्यात आला आहे. राज्यभरात घडत असलेल्या दंगलीच्या विषयावरही आघाडीचे नेते बोलणार आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली याची आकडेवारी जुळविण्यात येत आहे. त्यातून कोणत्या मतदारसंघात कशा दंगली झाल्या हे आघाडी मतदारांना सांगणार आहे. आमदार नीतेश राणे यांना अचानक आठवलेले हिंदूत्व, जिल्ह्यांमधून गायब राहणारे पालकमंत्री, मंत्र्यांकडून दाखविण्यात आलेला अहंकार हे सगळे मुद्दे सविस्तरपणे हाताळण्याची तयारी आघाडीने चालविली आहे.

Rahul Gandhi : हरियाणानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेस सक्रिय

पक्षनिहाय जबाबदारी

काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड हे महायुतीचा समाचार घेतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अभ्यासपूर्ण वक्तव्याचे काम असेल. शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांची भाषा आता थोडी बदललेली दिसेल. खासदार संजय राऊत मात्र मोदी, शाह, फडणवीस यांच्यावर ‘हार्ड हिटिंग’ कायम ठेवतील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख रोहित पवार हे मोर्चा सांभाळतील.

 

कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये कितीदा सरकारची खटिया खडी करण्यात आली हे सांगण्यात येणार आहे. रामटेकमध्ये लोकसभा निवडणुकीत रश्मी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. कोर्टाने मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचा निकाल दिला. जात पडताळणी समितीला दंडही ठोठावला. अशा प्रकरणांचा राज्यभरातून शोध घेण्यात येत आहे. त्यातून महायुती सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करीत असल्याचे मतदारांना पटवून देण्यात येणार आहे. एकूण साम, दाम, दंड, भेद असा सगळ्या आयुधांचा वापर करीत आघाडी निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!