महाराष्ट्र

Eknath Shinde : आधी प्रकल्पग्रस्तांचा संताप, मग काँग्रेसचे काळे झेंडे

Bhandara News : कार्यकर्त्यांकडून व्हीआयपी ताफा अडविण्याचा प्रयत्न

Congress Protest : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भंडाऱ्यात सोमवारी (ता. 24) दोन आंदोलनांचा सामना करावा लागला. 547 कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री शिंदे भंडाऱ्यात आले होते. कार्यक्रमस्थळी गोसेखुर्द प्रकल्पबाधितांनी आंदोलन केले. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यातील कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले. त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

शिंदे यांचा मुख्य कार्यक्रम सुरू असताना गोसेखुर्दच्या दोन प्रकल्पग्रस्तांनी चांगलाच गोंधळ घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. घोषणाबाजी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनीवर आंग टाकून दिले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी त्यांना फरफटत नेले. त्यानंतर जास्तीचे मनुष्यबळ गोळा करून त्यांना उचलून नेण्यात आले.

निषेधाची दुसरी घटना

निषेधाची आणखी एक घटना घडली जिल्हा परिषद चौकात. भंडारा ते गोसेखुर्दपर्यंत जलपर्यटनाची तयारी करण्यात येत आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमस्थळी जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा जिल्हा परिषद चौकात अडविण्याचा प्रयत्न केला.

Bhandara News : प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ

काही कार्यकर्ते तर त्यांच्या वाहना पुढे पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

भंडारा अन् आंदोलन

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कारणावरून भंडाऱ्यात आंदोलन होणाचा हा महायुती सरकारच्या कार्यकाळातील दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडाऱ्यात आले होते.

Narendra Bhondekar : आमदाराने सांगितली काम करून घेण्याची ‘निंजा टेक्निक’

त्यावेळी अजित पवार यांचे भाषण सुरू होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली होती. या कार्यकर्त्यांना तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र नंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनकर्त्याना हेलीपॅडवर बोलावून घेतले होते.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु कोणतेही सकारात्मक काम सरकारने न केल्याने सोमवारी पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. अशातच काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळेही भंडारा पोलिसांची धावपळ झाली. भंडाऱ्यातील हा घटनाक्रम पाहता सीएमचा दौरा आणि आंदोलन असे समीकरणच येथे तयार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा चांगलाच ताण पोलिस यंत्रणेवर येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!