Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशात जोरदार कमबॅक करीत अनेकांना आश्चर्यचकीत केले. देशात राहुल गांधींच्या नेतृत्वात झालेल्या ‘भारत जोडो’ आणि ‘न्याय यात्रा’ यामुळे काँग्रेसला नवी उभारी मिळाली. देशात काँग्रेसच्या यशात मोठी कामगिरी बजावली ती महाराष्ट्राने. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 17 जागांपैकी 13 जागा निर्विवाद जिंकून काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला.
काँग्रेसच्या या मुसंडीत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले महत्वाचे ठरले. त्यांचेपक्षसंघटन, कार्यकर्त्यांशी कनेक्शन कामात आले. थेट जनतेत उतरून केलेले काम हे योगदान उपयोगी पडले. काँग्रेसच्या या यशानंतर आता नाना पटोलेंकडे राज्यातील मोठी आणि महात्वाची जबाबदारी येऊ शकते. त्यादृष्टीने दिल्लीतील ‘हायकमांड’ची देखील नानांवर नजर असल्याचे बोलले जात आहे. नानांच्या चहात्यांनी ‘आता राज्याचे भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ अशा आशयाचे होर्डिंग मोठमोठ्या शहरात लावले आहेत.
विरोध कायम
यशामुळे समर्थकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांच्या, किंबहुना नानांच्या स्वप्नाला महाविकासात आघाडीतील घटक पक्षच रोडा टाकत असल्याचे दिसते. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सद्धा आलबेल नाही. नानांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला काँग्रेस व्यतिरिक्त इतर आघाडीचे घटक पक्ष समर्थन देतील का? हाच मोठा प्रश्न समोर आलेला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र गोंदिया-भंडाऱ्याचे पुत्र असलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पक्षाची पुनःबांधणी केली. काँग्रेसचे जुने नेते कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात त्यांना यशही आले.
India Alliance : भाजपला बॅक फूटवर नेण्यासाठी नानांचा ‘हा होता मास्टर’ प्लॅन !
काँग्रेसची मुसंडी
पोटोले यांनी केलेल्या कामाचे परिणाम लोकसभेच्या मतमोजणीतून दिसून आले. राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 17 पैकी 13 जागेवर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडून आले आहेत. या निमिताने ही सर्व किमया नानांचीच असल्याचे बोलले गेले. आक्रमक, खंबीर आणि सर्व सामान्यांसाठी धावून जाणारा अशी नाना पटोले यांची प्रतिमा. या निवडणुकीच्या निकालाने ही प्रतिमा अधिकच खुलून दिसली. आधीच हायकमांड आणि राहुल गांधींशी असलेले संबंध या विजयाने अधिकच गडद झाले. त्यामुळे काँग्रेसकडून सध्या तरी नानांच्या ‘मुख्यमंत्री’ होण्याच्या स्वप्नाला विरोध पाहायला मिळणार नाही, अशी चर्चा आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेली काँग्रेस ‘मुख्यमंत्री’ पदासाठी दावेदारी करेल यात शंका नाही.