महाराष्ट्र

Maharashtra Council : आमदार शिरीष चौधरींवर संशयाची सुई !

Shirish Chaudhari : म्हणाले, ‘हा तर माझ्या बदनामीचा डाव’

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याभोवती सध्या संशयाची सुई फिरत आहे. अधून मधून त्यांचे नाव समोर येत असल्याने आमदार चौधरी नाराज आहेत. उलट त्यांनीच आता दगाबाज आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. पक्षाने जनतेसमोर सत्य मांडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पक्षादेश पाळला नाही म्हणून आठ आमदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची माहिती आहे. या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचाही समावेश असल्याची चर्चा होती. मात्र, आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दगाबाज आमदारांमध्ये नाव घेऊन माझी बदनामी केली जात आहे. कुणीतरी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार करीत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार निवडून आलेत. तर, महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असतानाही महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर, भाजपने या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची सहा मते फुटल्याचा दावा केला. कॉंग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये शिरीष चौधरी यांच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. मात्र, चौधरी यांनी जनतेसमोर सत्य मांडावे अशी मागणी केली. भाजप खासदार अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचा असल्यामुळे मी फुटलो असा आरोप केला जात आहे. मात्र, या गोष्टीत कुठलेही तथ्य नाही. पाच, दहा कोटी रुपयांसाठी त्यांच्या पाया पडायचे म्हणजे हा राजकीय आत्मघात आहे असे शिरीष चौधरी यांनी म्हटलं आहे.

आम्ही एकनिष्ठ

ते म्हणाले, ‘1931 पासून आमचे कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी गद्दारी करणार नाही. फुटलेल्या आमदारांमध्ये माझे नाव घेऊन माझी बदनामी होत आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार होत आहे.’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आणि इतर नेत्यांसोबत बोलणे झाले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!