Bunty shelke : ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत’, असा गंभीर आरोप करून काँग्रेसचे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बंटी बाबा शेळके यांनी खळबळ उडवून दिली आहे. नाना पटोले यांनी अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या समर्थकांनी काल (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.
काँग्रेसचे पदाधिकारी हैदर म्हणाले, बंटी शेळके यांनी अशा प्रकारे प्रदेशाध्यांवर आरोप करायला नको होते. त्यांची काय तक्रार आहे, ती पक्षश्रेष्ठींकडे मांडायला पाहिजे होती. राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार करायला पाहिजे होती. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे पक्षाची बदनामी होत आहे. एकीकडे आम्ही ईव्हीएमच्या विरोधात देशभर लढाई लढत आहोत. दुसरीकडे बंटी शेळके यांनी पक्षातच संघर्ष उभा केला, हे अतिशय चुकीचे आहे.
परवानगी घ्यायला हवी होती
महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी बंटी शेळके यांनी परवानगी घ्यायला पाहिजे होती. पण त्यांनी तसे केले नाही. देवडिया भवन गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. आणखी पुढील काही दिवस साफसफाईच्या कामासाठी भवन बंद राहणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भवनाची साफसफाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे ते बंद आहे. यामागे दुसरे कुठलेही कारण नाही. बंटी शेळके विनाकारण सीन तयार करत असल्याचा प्रत्यारोप हैदर यांनी केला.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून 30 ते 35 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती. मी स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. बंटी शेळकेंना उमेदवारी देऊ नये, अशीही आमची मागणी होती. पण पक्षाने त्यांनी तिकीट दिली. त्यामुळे आम्ही तन-मन-धनाने बंटी शेळके यांचे काम केले. त्यामुळेच त्यांना 80,000 मतांचा पल्ला गाठता आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंटी शेळके यांचे काम करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही इमानेइतबारे बंटी शेळके यांचे काम केल्याचे हैदर यांनी सांगितले.
Bunty shelke : नाना पटोले देवडिया भवनला कुलूप लाऊन चाबी घेऊन पळून गेले
बंटी शेळकेच एजंट
नाना पटोले आरएसएसचे एजंट आहेत, असा आरोप बंटी शेळके यांनी केला. पण मुळात बंटी शेळकेच आरएसएसचे एजंट आहेत, असा प्रत्यारोप हैदर यांनी केला आहे. ज्या प्रकारे त्यांनी प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्षांवर आरोप केला. अशा दलालाला पक्षातून निलंबित केले पाहिजे. पक्षाने त्यांच्या कठोर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही राहुल गांधी यांची भेट घेणार आहोत. आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. पत्रकार परिषदेला अतुल कोटेचा, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले उमेदवार गिरीष पांडव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते होते.