Congress offer : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ते कमालीचे नाराज झाले आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, भुजबळांकडे मंत्रिपद होते. महायुतीमध्ये सामील झाल्यावरही त्यांच्याकडे मंत्रिपद आलं. मात्र महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात आलं. त्यामुळे ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी छगन भुजबळ यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. आता भुजबळांची नाराज पावलं कुठे वळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
रविवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी आटोपला. त्यात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावे नव्हती. अर्थात भुजबळ यांच्या स्वभावानुसार ते शांत बसणार नाहीत, हे सर्वांनाच माहिती होते. अगदी तसेच झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भुजबळ विधीमंडळ परिसरात आले आणि त्यांनी थेट अजित पवारांवर तोफ डागली. अजित पवारांशी चर्चा करण्याची गरज नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. सलग दोन दिवस अजित पवार अधिवेशनात न आल्यामुळे त्यांचा भुजबळांशी आमना-सामना होऊ शकला नाही.
मंगळवारी भुजबळ यांनी थेट त्यांचा मतदारसंघ गाठला. नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या येवला मतदारसंघात जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भुजबळांनी याठिकाणी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले. त्याचवेळी अजितदादांवर तोफ डागली. ‘मी कोणी लल्लू-पंजू नाही आणि दूध पिणारा बच्चाही नाही. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवून राज्यसभेचं काय बोलता? आता या बोलण्याला काहीही अर्थ नाही,’ या शब्दांत भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.
मंत्रिमंडळात कोण असणार आहे, याबाबत आपल्याशी कुठलीही चर्चा केली नाही, याचाही राग भुजबळांनी बोलून दाखवला. ‘अखेरच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळात कोण असेल, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. मला स्वतःला आपण डावलले जाऊ याची कल्पना नव्हती,’ असं भुजबळ म्हणाले. त्याचवेळी त्यांनी ‘कोण दादा? कसला दादाचा वादा? मी काही कुणाला दादा वगैरे मानत नाही. इथे लोकशाही आहे, सगळे समान आहेत,’ असा संतापही त्यांनी बोलून दाखवला.
महाविकास आघाडीचे मनोरंजन
महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेसचे नेते सोडायला तयार नाहीत. उत्तर नागपूरचे आमदार व माजी मंत्री काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी तर भुजबळ यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. ‘भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू,’ असं राऊत म्हणाले.
शरद पवारांकडे परत जाणार?
छगन भुजबळ यांना शरद पवारांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं. तरीही ते त्यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले, अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पण आता ते शरद पवारांकडे परत जाणार की तटस्थ राहण्याचा निर्णय घेणार याकडे सर्वांचंलक्ष लागलेलं आहे.