महायुती सरकार विरोधात काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन छेडले आहे. राज्यातील जनता आज अनेक समस्यांचा सामना करत आहे. पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप करीत राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने भरलेले पाय कार्यकर्त्याने धुवून देण्याचे प्रकरण घडले. या प्रकरणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील इतर पक्षांनीही जोरदार आक्रमण केले. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे हे चिखलफेक आंदोलन ‘नानां’च्या सुडाचा बदला समजला जात आहे.
महाराष्ट्रातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटीचे प्रकरण, महिला सुरक्षा, खते, बी-बियाण्यांचा काळाबाजार हे सर्व मुद्दे काँग्रेसतर्फे पुढे करण्यात आले आहे. या सर्व मुद्द्यांबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आज सर्वत्र चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत भाजपच्या पोस्टरवर चिखल फेकण्यात आले. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बी-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आला.
Congress Politics : ‘ती’ अट काढा, पांढरे रेशन कार्डधारकांना मोफत उपचार द्या
अनेक ठिकाणी रस्ता रोखला
मुंबई, नागपूर, पुणे, अकोला, अमरावती यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आज काँग्रेसने आंदोलन केले. नागपुरातील व्हेरॉयटी चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्य रस्ता रोखून तीव्र निषेध नोंदविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. नागपुरातील आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले. राज्यात शेतकरी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाची अवहेलना होत आहे. राज्यातील सरकार जनता विरोधी आहे. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे काम हे चिखल फेकण्यासारखेच आहे, अशी घणाघाती टिका करीत विकास ठाकरे यांनी महायुतीचा निषेध नोंदविला. पंतप्रधान मोदींनी एकीकडे शेतकऱ्यांकरिता एमएसपी जाहीर केली. मात्र आधीच वाढलेली भरमसाठ महागाई यामुळे शेतकऱ्याला एक रुपयाही वाचणार नाही. सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने, महात्मा फुलेंच्या नावाने योजना काढल्या. पण त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नाही, असा आरोप विकास ठाकरेंनी केला.
अकोल्यात महायुती सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, पक्ष निरीक्षक धनंजय देशमुख, महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याणमध्ये महायुतीचा प्रतिकात्म पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चिखलफेक करण्यात आली.