Congrees Gone Aggressive : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस परीक्षांमधील गैरप्रकारांच्या मुद्द्यावर गाजला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा आणि उपायांची मागणी सरकारकडे केली होती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेसने काही मुद्द्यांवर लोकसभेत बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी सोमवारीच (ता. 22) या विषयावर आवाज उठविला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी नीट परीक्षेवरील गैरप्रकारावर सरकारची बाजू मांडली.
प्रधान यांच्या निवेदनानंतर लोकसभेत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. या गोंधळानंतर प्रधान म्हणाले की, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court Of India) जो निर्णय देईल, त्यानुसार सरकार त्याचे कडक पालन करेल. न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्यास सांगितले. त्यानुसार निकाल सार्वजनिकपणे इंटरनेटवर जाहीर करण्यात आले आहेत. त्यावर खासदार राहुल गांधी यांनी आपले मत मांडले.
शिक्षण प्रणालीवर टीका
परीक्षा पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. शिक्षणमंत्र्यांनी प्रत्येकाच्या उणिवा मोजल्या. मात्र त्यांना शिक्षण विभागाच्या व सरकारची कमी दिसली नाही. भारतातील परीक्षा पद्धत मूर्खपणाची आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. देशाची परीक्षा पद्धत मूर्खपणाची असल्याचे विरोधी पक्षनेत्याचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे, असे यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नुसते ओरडून खोटे सत्य होत नाही, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने सरकार कसे चालवले हे जनतेला माहीत आहे. काँग्रेसचे सरकार रिमोटने चालते. एडीएचे (NDA) सरकार रिमोटने चालत नाही, असे प्रत्युत्तरही प्रधान यांनी दिले.
संसदेत गदारोळ
नीट परीक्षेबाबत संसदेत प्रचंड गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान नीटवर विरोधी खासदारांना उत्तर देत होते. त्यांच्या उत्तरादरम्यान अनेकवेळा गदारोळ झाला. राहुल गांधी, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी नीटवर प्रश्न उपस्थित केले. खासदार गौरव गोगोई यांनीही सरकारवर टीका केली. सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी संसदेबाहेर म्हणाले, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर द्यायला हवे होते. सुप्रीम कोर्ट आणि नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi) ते बोलले. त्यांनी ते काय करत आहेत हे सांगितले नाही. नीट परीक्षा हा तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही यावर नेहमीच संसदेत चर्चेची मागणी केली. मात्र सरकार त्यात रस घेत नाही. यापुढेही हा मुद्दा मांडून सरकारवर दबाव आणणार आहोत.