Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खासदार संजय राऊत म्हणजेच शिवसेना असे समीकरण झाले आहे. संजय राऊत यांनी कोणतेही वक्तव्य केले तरी, एक ठाकरे त्यांची री ओढतात. परंतु संजय राऊत यांच्या एका लेखामुळे महाविकास आघाडीमधील आणखी एक ठाकरे चांगलीच भडकले आहेत. त्यांचा संताप इतका आहे की, ते ‘हायकमांड’कडे संजय राऊत यांची तक्रार करणार आहेत. इतकेच नव्हे तर यांना महाविकास आघाडीत सोबत ठेवायचे का? असा प्रश्नही ते पक्षश्रेष्ठींना करणार आहेत.
खासदार संजय राऊत यांच्यावर भडकलेले हे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीत. भडकलेले हे ठाकरे आहेत काँग्रेसचे नागपूर येथील आमदार विकास ठाकरे. विकास ठाकरे यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री तथा भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. अशातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून संजय राऊत यांनी एक लेख प्रकाशित केला आहे. या लेखात राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर भरपूर टीका केली आहे.
ओघात विसरले भान
लेख लिहिण्याच्या नादात संजय राऊत हे भान विसरल्याची टीका आता होत आहे. नागपुरात नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले, असा उल्लेख राऊतांनी आपल्या लेखात केला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी विकास ठाकरे यांना मदत केली का? असा प्रश्न तर राऊत यांनी उपस्थित केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. राऊतांचा हा लेख प्रकाशित झाल्यानंतर आमदार विकास ठाकरे यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांच्या या लिखाणाची तक्रार विकास ठाकरे पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना राऊत अशा प्रकारचे लिखाण कसे करू शकतात, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
सोबत का राहायचे?
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे. अशातच त्यांच्या लेखामधील उल्लेखामुळे नागपुरात काँग्रेसबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले आहे. अशा पक्षाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यायचे का? असा सवालही आमदार ठाकरे पक्षापुढे उपस्थित करणार आहेत. खासदार संजय राऊत यांना नागपुरातील राजकारण काय माहिती? असा टोलाही विकास ठाकरे यांनी यावेळी लगावला. संजय राऊत यांच्या अति उत्साहीपणामुळेच शिवसेना आणि भाजपमध्ये फुट पडली, असा आरोप होतो.
शिवसेनेमध्ये दोन गट तयार होण्यालाही संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, अशी टीका सातत्याने केली जाते. संजय राऊत शिवसेनेत असले तरी त्यांची निष्ठा शरद पवार यांच्याप्रति आहे, असे भाजप नेहमीच म्हणते. अशातच आता महाविकास आघाडीमधील सर्वांत मोठा घटक पक्ष, काँग्रेसही राऊतांवर नाराज झाला आहे. या नाराजीची ठिणगी आता नागपुरातून पडली आहे. त्यावर काँग्रेस कोणती भूमिका घेते याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.