Samvidhan Square Nagpur : बदलापुरातील शाळेत बालिकांवर अत्याचार झाला. ही शाळा आपटे नावाच्या गृहस्थाची आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाळा आहे. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा उभारणारही योगायोगाने आपटेच आहे. हा जयदीप आपटेही संघाचाच आहे. त्यामुळे आधुनिक पेशवाईने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी हा आरोप केला.
नागपुरतील संविधान चौकात महिला प्रदेश काँग्रेसच्यावतीने नारी शक्ती आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकुल वासनिक, अलका लांबा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी आमदार सुनिल केदार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाचा उजाळा दिला. ते म्हणाले, पेशव्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता. त्यामुळे गागाभट्ट यांनी पायाच्या अंगठ्याचे शिवाजी महाराजांचा टिळा लावला. आता हेच आधुनिक पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करीत आहेत.
राज्य असुरक्षित
महाराष्ट्र असुरक्षेच्या छायेत आहे. महिला सुरक्षित नाहीत. चार वर्षांच्या बालिकांवरही धोका आहे. राज्यातून महिला, तरुणी बेपत्ता होत आहेत. त्यानंतरही असंवैधानिक सरकार दुर्लक्ष करीत आहे. महायुती सरकार महाभ्रष्ट आहे. प्रत्येक कामात कमिशनखोरी सुरू आहे. गुन्हेगारीत वाढ झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. सरकारमधील तीनही पक्ष केवळ पैसा कमाविण्यात व्यस्त आहेत. जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. मात्र सरकारला याचे काहीच देणेघेणे नाही. राज्यातील बेपत्ता महिला, तरुणींबाबत सतत प्रश्न विचारत आहोत. मात्र सरकार कोणतेही उत्तर देत नाही. खालपासून वरपर्यंत सगळे अधिकारी आपल्या सोयीनुसार भरण्यात आले आहे. त्यामुळे सगळी मिलिभगत असल्याचा आरोपही, पटोले यांनी केला.
सरकार राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून आमिष दाखवत आहे. परंतु महिलांना लाडकी बहीणीपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. शेतकरी, शेतमजुराला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सरकार मात्र इव्हेंटबाजीत व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईने राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा इव्हेंट सरकारने केला. हा कार्यक्रमही घाईत घेतला. ज्यांना काहीच अनुभव नाही, अशांना काम दिले. सरकार केवळ आपल्या कंपुतील लोकांना आर्थिक फायदा देण्यासाठी हा प्रकार करीत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.