Nagpur constituency : देशातील समाजांना हजारो वर्षांपूर्वी मनुस्मृतीच्या माध्यमातून विभागण्याचे काम करण्यात आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र अशा वर्णात विभागले गेले आणि आता भाजपचे नेते ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ असे नारे देत आहेत. पंतप्रधान मोदींना या देशातील लोकांना खरंच एक करायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम लोकांना विभागणारी मनुस्मृती जाळावी, या शब्दांत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आव्हान दिले. नागपूर उत्तरमध्ये इंदोरा मैदानात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर श्रीमंत लोकं राहतात. त्यांना ईडी, सीबीआय, आयकर यांच्या माध्यमातून घाबरवून तसेच इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून पैसा गोळा केला जातो आणि हा पैसा भाजप आपल्या निवडणुकीवर खर्च करते. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतीय जनता पार्टीचे एटीएम कार्ड आहे, अशी टीका खरगे यांनी केली.
दरम्यान, खरगे यांनी अगोदर घेतलेल्या पत्रपरिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘झूठों के सरदार’ असल्याचे शब्द वापरले. ज्या गुजरातमध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. जेथील सरदार वल्लभभाई पटेल देशाच्या अखंडतेसाठी झटले. त्याच प्रदेशातून येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. मोदी यांनी विदेशातील काळे धन आणले नाही, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत. भ्रष्टाचार थांबला नाही. खोटं बोला, पण रेटून बोला, असे भाजपचे सुरू आहे. एकीकडे काँग्रेसच्या गॅरंटीला रेवडी म्हणता मग त्याच योजना स्वत: का जाहीरनाम्यात सांगत आहात, असा सवाल त्यांनी केला.
Nitin Gadkari : काँग्रेसने साठ वर्षांत साधे रस्तेही बांधले नाहीत
फडणवीस हरणार – पटोले
उत्तर नागपूरच्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक हरणार असल्याचा दावा केला आहे. अमित शाह यांनी फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री हरणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र मुळात फडणवीस यंदाची निवडणूक हरतील, अशी व्यवस्था आम्ही लावून ठेवली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही नाना पटोले म्हणाले.