महाराष्ट्र

Nana Patole : महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप 

Congress : विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला देणार धक्का

Preparation Of Assembly Election : महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महापाप महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता यासाठी त्यांना कधीही माफ करणार नाही. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला धक्का दिला. स्वयंघोषित विश्वगुरु यांनी राज्यात 17 सभा घेतल्या. परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली. जनता सगळे विसरून जाते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण जनता काहीही विसरलेली नाही. महायुतीने केलेल्या विश्वासघाताची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीतही भोगावी लागेल, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील गांधीभवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीत प्रदेशाध्यक्ष पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. यावेळी पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही. जागा वाटपाचा निर्णय मेरीटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला तीनही पक्ष सामोरे जातील. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल.

मुख्यमंत्रिपदाबाबत एकमत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अशीच भूमिका मांडली होती. काँग्रेसच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली. राज्यातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन करण्यात आले. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विविध घटकांशी चर्चा करुन राज्यातील जनतेला अपेक्षित जाहिरनामा तयार करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्ली भेटीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काही पहिल्यांदा दिल्लीला गेलेले नाहीत. ते यापूर्वीही दिल्लीला गेले होते. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनासह सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही ते भेटत आहेत. या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सोनिया गांधी देशातील महत्वाच्या व्यक्ती आहेत. पंतप्रधानपद नाकारणाऱ्या त्यागमूर्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दोनदा काँग्रेसप्रणित युपीए सरकार देशात सत्तेत होते, असेही पटोले म्हणाले.

Sudhir Mungantiwar : विरोधी पक्षातील नेत्यांचेही मन जिंकले

सोनिया गांधी यांना उद्धव ठाकरे भेटत असतील तर त्यात गैर काय? जागा वाटपाची जेंव्हा अंतिम बैठक असेल त्यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा होईल. कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही. भाजपा सरकार गुंडगिरी, ड्रग्ज माफियांना अभय देत आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. दुसरा गणेशोत्सवात गोळीबार करतो. व्यापाऱ्याला धमकावले जात आहे. राज्यात 15 हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. कायदा व पोलिसांना कोणीच जुमानत नाही, असे चित्र आहे. तळोजा जेलमध्ये कैद्यांना ‘फाइव्हस्टार’ सुविधा मिळत आहेत. गुंडांना पाठिंबा देणारे महायुती सरकार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!