Political News : अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जोरदार फटका बसला. देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचे नुकसान झाले असा आरोपही झाला. फडणविसांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारीही केली. आता फडणविसांची जादू संपली, असे बोलले जाऊ लागले. मात्र शुक्रवारी (दि. १२) विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर फडणविसांचा ‘जादू चल गया’ अशी शाबासकी राजकीय विश्लेषक देत आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत 9 उमेदवारांना पुरतील एवढी मते नसताना देखील फडणवीसांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणले. विधानपरिषद निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2, उबाठा गटाचे 1 आणि काँग्रेस पक्ष 1 असे 11 उमेदवार निवडून आलेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडील 64 मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेले शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता, मविआकडील एकूण 7 मतं फुटल्याचं समोर आलं आहे.
फडणवीस ठरले ‘किंगमेकर’
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे 5 मते कमी होती जी त्यांनी काँग्रेस पक्षाची फोडली आणि आपल्या उमेदवाराला निवडणून आणले. या सर्व प्रक्रियेत भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच किंगमेकर ठरल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी 10 जून 2022 ला राज्यसभा तर 20 जून 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपला ‘मॅजिक पॅटर्न’ वापरत मविआला धक्का दिला होता. त्यामुळे मविआ सरकार कोसळले होते. त्यामुळे आताच्या विधानपरिषदेच्या नियोजनाची आणि मतांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती.
झाले उलटेच
लोकसभेच्या निकालामुळे वातावरण बदलल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट महायुतीच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, झाले उलटेच. निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची जादू कायम असल्याचे दिसून आले. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्रिक करुन दाखवली. त्यांनी सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना धोबीपछाड दिला आहे.
काँग्रेसची एकूण 7 मतं फुटली
विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती.
Maharashtra Assembly : आम्ही मेंढरं आणि मेंढपाळांचीही घेतोय काळजी !
विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 7 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.