Congress : रामटेक मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी राजेंद्र मुळक यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. अगदी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सखोल चर्चा देखील करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांनी ही जागा बदलण्यासाठी सकारात्मक प्रतिसाददेखील दिला होता. मात्र अदृश्य शक्तींनी घात केला व कॉंग्रेसच्या हातून तो मतदारसंघ गेला. ती अदृश्य शक्ती कुणाची होती असाच सवाल राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
काँग्रेस आग्रही
रामटेकसोबतच हिंगणा मतदारसंघासाठीही काँग्रेस आग्रही होती. परंतु, दोन्ही जागा काँग्रेसला मिळालेल्या नाही. सोमवारी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत रामटेक व हिंगणा अपक्ष लढण्याचे संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवाराला लीड मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत हिंगणा व रामटेक काँग्रेसला मिळावे, असा आग्रह होता. मात्र दोन्ही जागा खेचून आणण्यात पक्षनेत्यांना अपयश आले.
कॉंग्रेस नेत्यांची बैठक
या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याला खा. श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आमदार विजय घोडमारे, माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, जि.प. सदस्या उज्ज्वला बोढारे, वृंदा नागपुरे, संजय जगताप, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, श्याम मंडपे, पंचायत समिती सभापती मनोहरे आदी उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयानुसार हिंगणा विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्ज्वला बोढारे व वृंदा नागपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातील एक उमेदवारी अर्ज कायम ठेवला जाईल. याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
Assembly Election : उमेदवारी नाकारली म्हणून आत्महत्येचा विचार
चांगले परिणाम
गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक असाे वा ग्रामपंचायत निवडणुकीत याचे चांगले परिणाम मिळाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी पदधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला. आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे परंतु, आघाडीत काँग्रेस उमेदवाराला डावलल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.