नागपुर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीत ठिणगी पाडून गेले. पूर्व नागपूरच्या जागेवर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्र पक्षासाठी सोडणार नाही,’ असे काँग्रेसने ठणकावून सांगितले. संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसचे विकास ठाकरे कडाडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. याच मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत कुरबुर सुरु झाली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकी 96 जागांवर सहमी होऊ शकते. महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार. समान जागांवर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यामध्ये बऱ्याच अंशी मविआतील नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, मविआच्या नेत्यांमधील कुरबूर जागावाटपाच्या चर्चेत अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
सर्व जागा राऊतांच्या पक्षासाठी सोडू
संजय राऊतांनी दक्षिण नागपुरातील जागेवर केलेला दावा वादाचे कारण ठरले आहे. ‘2019 साली विधानसभा निवडणुकीत केवळ 4 हजार मतांनी दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. असे असले तरी आमच्या पक्षात अंतिम निर्णय हायकमांडचा असतो. जर हायकमांड म्हणेल तर नागपूर शहरातील सर्व सह जागा संजय राऊत यांच्या पक्षासाठी सोडू,’ असे सांगत विकास ठाकरेंनी संजय राऊत यांच्या दाव्याची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्री हायकमांड ठरवेल
आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचे संजय राऊत सांगत फिरत आहेत. महाविकास आघाडीमध्ये असले तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण राहील याबाबत माध्यमांशी बोलू नये. त्यांनी आमच्या हायकमांडशी याबाबत बोलले पाहिजे, असे विकास ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे आमदार नितीन राऊत यांनी देखील राऊत यांच्या दाव्यावर हेच विधान केले होते.