Anger Of Congress : देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. . यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये एक्सप्रेस-वे बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले ठेंगा! अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर भर आहे. बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भातही वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ट्विट करीत मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये वडेट्टीवार म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळेच बजेटमध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. परंतु त्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले? ठेंगा! देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
निवडणुकीवर परिणाम शक्य
केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे. हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली की गुजरात. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल! असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून आर्थिक तरतूद कऱण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राला काहीच मिळालेले नाही.
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी महत्वाच्या योजना जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण या भरभरून देतील असे वाटत होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, झारखंड आणि हरीयाणातही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सर्व राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप दिले जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला (Mahayuti) बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.