मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय व्हायचा तो होईल. त्यांनी मंत्रिमंडळ कुठेही करावे. आम्हाला त्याचं काहीही देणंघेणं नाही. जनतेने त्यांना बहुमत दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कापूस, सोयाबीनला भाव नाही. कर्जमुक्तीचा अद्याप पत्ता नाही. कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन ते सत्तेत आले आहेत. दिलेल्या आश्वासनांवर हे लोक कधी काम करणार, असा सवाल काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपुरात आज (14 डिसेंबर) आमदार वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवा आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे. सर्वत्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी कितीही पैसे खावे. पण लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण कराव्या. आरोग्य विभागात तर सगळा आनंदी आनंदच आहे. शस्त्रक्रिया झालेल्या बाळंतीन महिलांना खाली झोपण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थिती असेल तर सरकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होतो.
अधिवेशनात कापूस सोयाबीनचा मुद्दा..
आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, सर्वत्र भ्रष्टाचार सुरू आहे. सरकार येऊन एवढे दिवस झाले, तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांची चर्चाच सुरू आहे. तुम्ही आपापसांत बसून चर्चा करत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही. त्यामुळे अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ. कापूस, सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, हे मुद्दे आम्ही या अधिवेशनात उचलून धरणार आहोत.
Cabinet Expansion : ‘देवाभाऊ’ निभावणार का ‘शासन’ आल्यावर ‘वचन’?
तो निर्णय वडेट्टीवार, पटोलेंचा नसेल..
नाना पटोले यांना विधिमंडळ पक्षनेता होण्यामध्ये रस आहे. म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला असल्याची चर्चा आहे, यावर मला यासंदर्भात माहिती नाही. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा निर्णय हायकमांड करणार आहे. दिल्लीत याचा निर्णय होईल. 17 डिसेंबरला आमचे प्रभारी रमेश चेन्नीथला येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा होईल. तेव्हा कोणाला गटनेता करायचं, याचा निर्णय होईल. तो निर्णय नाना पटोलेंचाही नाही आणि विजय वडेट्टीवार यांचाही नाही, असे ते म्हणाले.
येवढ्या खाली कधीच आलो नव्हतो..
राजकारणात जय पराजय होत असतो. मात्र यावेळी जो निकाल आला, त्याबाबत हायकमांड गांभीर्याने चर्चा करत आहे. म्हणूनच आमचे प्रभारी येत आहेत. चर्चा होईलच, मात्र नव्याने पक्ष उभारण्याची गरज आहे, हे काही लपून राहिलेले नाही. आम्ही कुठल्याही लाटेमध्ये अद्याप 16 पर्यंत खाली आलेलो नव्हतो. आता कुठलीही लाट नसताना आम्ही 16 पर्यंत आलो, हे आश्चर्यकारक आहे. यामागे ईव्हीएमचे कारण आहे की आणखी दुसरे काही कारण आहे, हे कालांतराने पुढे येईलच. आमची मागणी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची आहे. त्यासाठी आम्ही लढा देत आहो, असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.