Exit Poll : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निकालाचे एक्झिट पोल जाहीर झाले आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असे दिसत आहे. निकालामुळे इंडिया आघाडीचे (काँग्रेस) स्वप्न भंगणार आहे. यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केले आहे. एक्झिट पोलचा दावा खोडून काढत काँग्रेसचे सरकार येण्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
एक्झिट पोलनुसार मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी येणार असल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर विजय वडेट्टीवारांनी शंका व्यक्त केली आहे. सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी एक्झिट पोलचे असे आकडे सांगितले जात आहेत. भाजपाबद्दल देशभरातील जनतेच्या मनात राग दिसत आहे. अशात एक्झिट पोलनुसार जर निकाल मोदींच्या बाजूने आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी एका मुलाखतीत केले आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
हे एक्झिट पोल आहे. निकाल येईल तेव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. 10 वर्षे जनतेने सरकारचा त्रास सहन केला आहे. विकासाचे मुद्दे भाजपकडे नसल्याने ते निवडणूक हरत आहेत. हे भाजपला स्पष्ट दिसले. म्हणून निवडणूक जाती, धर्मावर नेली. एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील. मोदी सरकारचा पराभव होणार, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
काही एक्जिट पोल जागा कमी दाखवतात. काही जास्त दाखवतात. महाराष्ट्रात काँग्रेसला 35च्या आसपास जागा मिळतील. कर्नाटकातही आम्ही पुढे राहू. मोदी सत्तेत येत आहेत, याचा 2 दिवस आनंद आहे. 4 जूनला सगळे स्पष्ट होईल. एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांचे काम करतात. काही बरेही असतात. अनेकदा पोल चुकलेही आहे, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्रात विजय
भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील. त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. देशात बदलाचे वारे आहेत. त्यामुळे देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचेच (काँग्रेस) सरकार स्थापन होणार. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयावह होत आहे. हसन मुश्रीफ अजूनही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी परवानगी का मागितली नाही. हे नियम शिथिल करण्यासाठी परवानगी मागत नाहीत. टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.