महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : बाळू धानोरकर, सुधाकर अडबालेंना..; तरी माझ्याविरुद्ध प्रचार

Lok Sabha Election : जातीय द्वेषाच्या पोस्ट व्हायरल झाल्याने व्यक्त केली नाराजी

Chandrapur Constituency : चंद्रपूरमध्ये कॉंग्रेसच्या तिकीटासाठी ‘उंदीर-मांजराचा खेळ’ सुरू असल्याची परिस्थिती आहे. वडेट्टीवार आणि धानोरकरांचे समर्थकांचा सोशल मिडियावर वॉर सुरू झाला आहे. अशात कार्यकर्त्यांकडून जुन्या पोस्ट शोधून त्या व्हायरल केल्या जात आहेत. काँग्रेसमध्ये जात-पात कधी पाहिली जात नाही. राजकारण करताना अशा पद्धतीने आमच्या विचारधारेने काही स्वार्थी, मतलबी लोक विषारी विचार पेरत असतात, अशी टीका यावर काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

2019 मध्ये दिवंगत बाळू धानोरकर यांचीही तिकीट मिळवून आणली आणि त्यांना निवडूनही आणले. येवढेच नव्हे तर शिक्षक आमदार आमदार सुधाकर अडबाले यांनाही तिकीट मिळवून दिली असल्याचे वडेट्टीवारांचे म्हणणे आहे. गेली अनेक वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे. मी कधी जातीय द्वेष केलेला नाही. ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. पाच -दहा लोकांचं हे टोळके आहे. ते हेच धंदे करीत असतात. बाळू धानोरकरांना तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सुधाकर अडबाले यांच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची तिकीट कापली गेली असतानाही मिळवून दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राजकारणातील एक टोळके विषारी जातीय द्वेष पसरवत आहे. मी कुठल्याही समाजाचा, कधीही द्वेष केलेला नाही. बहुजन समाजातील छोटा कार्यकर्ता असा द्वेष करून कधीही मोठा होऊ शकत नाही. तिकीट कोणाला द्यायचे, हा निर्णय घेण्याचा अधिकार हा ‘हायकमांड’चा आहे. मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितली त्यात दोष काय? मी अनेकांचे नाव सुचविले आहे, असेही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने सुधीर मुनगंटीवार या बलाढ्य नेत्याला उमेदवारी दिली. काँग्रेसचे अजूनही काही ठरलेले नाही. उमेदवारीचा घोळ अजूनही सुरू आहे. राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी यांच्यासाठी तिकीट मागितली आहे.

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेले नाही. याबाबत विचारले असता, लवकरच तिकीट वाटप जाहीर होईल. चंद्रपूरसाठी मला ‘हायकमांड’ने विरोध केलेला नाही, असे सांगताना भाजप नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यावरही वडेट्टीवारांनी टीका केली. फाटली चाटली घातली, असे शब्द वापरणे हे त्यांच्या संस्कृतीत बसते का? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आशिष देशमुख 2019 मध्ये कोणाची तिकीट मागण्यासाठी आले होते, याचे उत्तर जर त्यांनीच दिले तर योग्य होईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!