Congress Vs Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर सभेत खुलेआम जनतेशी खोटे बोलत आहेत. स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. मुख्यमंत्री दोन महिन्यात एका आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याचे सांगत ‘फेक नरेटिव्ह सेट’ केला आहे. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरू असल्याची टीका विधानसभेचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी पोलखोल करीत आरोप केला. दोन महिन्यात कोणाला फाशीची शिक्षा दिली, त्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान वडेट्टीवार यांनी शिंदे यांना दिले आहे.
बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिली. भर सभेत मुख्यमंत्री शिंदे हे बोलले आहेत. शिंदे धडधडीत खोटे बोलतात. मुख्यमंत्र्यांनी सांगावे महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी देण्यात आली. महायुती सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झालेली नाही. अशी शिक्षा झालेली असेल तर त्यांनी तपशिल जगजाहीर करावा, असे वडेट्टीवार म्हणाले.
एसआयटीचे काय करणार?
महायुतीचे सरकार हे महाविनाशी सरकार आहे. महायुती सत्तेवर आल्यापासून फक्त एसआयटीची स्थापना होते. त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? असा सवाल उपस्थित होतो. मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटे बोलतात. स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतात. न केलेल्या कामाचे श्रेय घेतात. बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. यातील आंदोलनकर्ते बदलापूर बाहेरचे होते, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. सरकारने पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. पण सरकारवर एखादा आरोप झाला की, लगेच विरोधकांना दोष देण्यात येत आहे. सरकार स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घेत नाही. फक्त फेकाफेकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. फेकाफेकीत महायुतीचे नेते पटाईत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ संदेशही जाहीर केला आहे. त्यात त्यांनी सरकावर ताशेरे औढले. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यालाही काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे.
बंदची हाक
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले. बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.