Statement On Police : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी दिली. बायकोचाही फोन येणार नाही, अशा ठिकाणी पाठवू, अशा शब्दांचा त्यांनी पोलिसांसाठी वापर केला. काही अधिकाऱ्यांमुळे पोलिस विभाग बदनाम होत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव बदनाम होत आहे. कामचोरी करणाऱ्या अशा सडक्या आंब्याना काढून टाकण्याचा इशारा दिला आहे, असे राणे म्हणाले. नितेश राणे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. त्यानंतर अकोल्यात राणे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस प्रामाणिकपणे जनतेची सेवा करीत आहेत. त्याच पोलिसांना धमकाविणे चुकीचे आहे. अशा वक्तव्याने नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे पोलिसांचा आणि देशाचा अपमान आहे. राणे यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेची मस्ती, सत्तेची गर्मी आहे. त्यामुळेच असे बोल त्यांच्या तोंडातून निघतात, असे वडेट्टीवर म्हणाले. जनता अशा लोकांना चांगलाच धडा शिकवेल. जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवेल, हे दोन महिन्यांनी कळेल, अशी टीकाही त्यांनी केली.
धमकीचा निषेध
नितेश राणे यांनी पोलिसांना दिलेल्या धमकीचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी निषेध केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की राणे यांच्यासारख्या लोकांना प्रसिद्धी देऊ नये. महाराष्ट्रातील पोलिसांचे मनोबल त्यामुळे खचेल. पोलिस आपले कर्तव्य पार पाडतात. जनतेची सेवा करतात. त्याच पोलिसांना अशा प्रकारची वागणूक देणे चुकीचे आहे. नितेश राणे यांच्या मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कायम आहेत. हा समज राणे यांना नसेल तर ते लोकशाही, संविधान मानतात का? असा प्रश्न देखिल निर्माण होतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री कार्यालयात अजित पवार यांच्या मंत्र्यांच्या फाइल ‘वेटिंग लिस्ट’वर असल्याच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. याबाबतही त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. सरकारमध्ये शीतयुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तीनही पक्ष एकमेकांची जीरवायची यात धन्यता मानत आहे. दोघे मिळून तिसऱ्याची जीरवायची असा प्रकार सुरू आहे. सरकारमधील तीनही पक्षांचे काम सोयीस्करपणे चालले आहे. हा संपूर्ण तमाशा महाराष्ट्राची जनता पाहात आहे. तिजोरी ओरबडून खाण्याचा हा प्रकार आहे. तीनही पक्षात ‘कोल्डवॉर’ आहे. त्याचा फटका जनतेचा बसत असल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.