Leader Of Opposition : नागपूर शहरात विकासाच्या नावावर केवळ चमकोगिरी करण्यात आली आहे. ऊन, वारा, पाऊस यांचे कोणतेही नियोजन न करता विकास केल्याचा देखावा तयार करण्यात आला आहे. आता पावसाचे पाणी वाहून जायला जागा नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूर आला आहे. गेल्या अतिवृष्टीत अनेकांचे नुकसान झाले होते. सरकारने पंचनामा करण्याचा बनाव केला. परंतु त्यातील अनेकांना अद्यापही मदतच मिळाली नाही, अशी टीका काँग्रेस नेते तथा विधानासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
शनिवारी नागपूर शहरात सात तासात सुमारे सव्वा दोनशे मिलिमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते बंद झालेत. जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे लोक पुरात अडकले आहे. नागपुरात कोणतीही मोठी नदी नाही. नागपुरात समुद्रही नाही. त्यानंतरही नागपूर शहर पाण्यात बुडते, यावरून विकासाच्या नावाखाली केवळ चमकोगिरी करण्यात आली आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यावे, असे वडेट्टीवार म्हणाले. आपण आता पूरग्रस्त भागांमध्ये फिरणार आहोत. लोकांकडून वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत, असेही ते म्हणाले.
पाणी वाहून जाईलच कसे?
उपराजधानी नागपुरात सगळीकडे सिमेंटचे जंगल उभारण्यात आले आहे. सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याच नाही. योग्य ड्रेनेज नसल्याने लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्ते उंच झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील पाणी लोकांच्या घरात जाते. अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढत असेल तर किती विकास झाला आणि कसा विकास झाला, हे प्रत्येकाच्या लक्षात येत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. नागपुरातील दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यानंतर अनेक भाग पाण्याखाली जातात. यंदाही जुलै अखेरीस मान्सूनचे नागपूरला तडाखा दिला आहे. पाऊस जितका नागपुरात बरसला नाही, तेवढे विरोधक आता सरकारवर बरसत आहेत.
फुटीरांवर कारवाई होणारच
विधानसभा निवडणुकीत काही आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले. त्या आमदारांविरुद्ध नक्कीच कारवाई होणार आहे. काँग्रेसची नुकतीच एक बैठक मुंबईत (Mumbai) झाली. या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी कारवाई होईल असे जाहीर केले आहे. लवकरच आमदारांविरुद्ध कारवाई झाल्याचे जाहीर करण्यात येईल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसमधील काही नेते भाजपसोबत संपर्कात आहेत. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, काही लोक अशोक चव्हाण यांच्यामुळे निवडून आले आहेत. ते चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाऊ शकतात, हे काँग्रेसला आधीच ठाऊक होते. त्यासंदर्भात आमची तयारीही होती. असे नेते भाजपसोबत गेल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.