Nagpur News : लोकसभेत बहुमत मिळविलेल्या एनडीएने आज मंत्रिमंडळ स्थापित केले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रात महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटाच्या आशा अपेक्षांवर मात्र पाणी फेरले गेले आहे. राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा आता हवेत विरली. अजित पवार गटाच्या या स्थितीवर विरोधकांनी आता चांगलाच समाचार घेतला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘उपयोगी असला तर उपयोगात आणायचा. हे भारतीय पक्षाचे नेहमीच धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उपयोगीता संपली आहे. त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसं ‘डस्टबीन’मध्ये जातात,’ असा टोला लगावला. प्रभू श्रीरामांनी अयोध्या भूमीत ‘इंडिया’ आघाडीला आशीर्वाद दिला. श्रीराम आमचे श्रद्धास्थान आहे. पण आता अजित पवार या स्थितीतून, दुःखातून कसे सावरतात याकडे महाराष्ट्र बघत आहे, असेही ते म्हणाले.
काम झाले आमचे, काय करावे तुमचे?
मोदी सरकारने बहुमत मिळविले. त्यामुळे एका खासदाराचे महत्व पाहता राहिले काय आणि गेले काय? अजित पवार गटाची मजबुरी आहे. यांना सत्तेसोबत राहावेच लागेल. धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे. एका खासदारावर कॅबिनेट मंत्रिपद कशाला देतील. लोकसभेच्या एका जागेवर अजित पवार गटाला एक राज्यमंत्रिपद मिळत होते. ते त्यांनी स्वीकारायला पाहिजे होते, असा उपरोधिक टोलाही वडेट्टीवारांनी लावला.
‘सुखके सब साथी दुख मे ना कोई’ असे बसते. आता जेडीयु आणि चंद्राबाबूंच्या दुःखात कोण राहील हे येणार काळ सांगेल. चंद्राबाबू नायडूंना एकच कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यांची बिना पाण्याने हजामत केली आहे. त्यांचीही स्थिती दयनीय आहे, असेही ते चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत म्हणाले. तिसऱ्यांदा शपथ घेताना मोदींनी पुढल्या काळात दोन मित्र पक्षांचा पक्ष फोडला नाही म्हणजे मिळविले. मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षदा दिल्या तर नवल वाटू नये, असेही ते वडेट्टीवार यांनी नमूद केले.
जेडीयूला खूप अपेक्षा होत्या. आता मोदी सरकार जे देतील ते घ्यावे लागेले. नाहीतर तेही मिळणार नाही. चंद्रबाबू आणि जेडब्ल्यूची पार्टी बाहेर पडू नये यासाठी प्रयत्न राहणार आहे. पुढील सहा महिन्यात काय होते हे पाहण्यासारखे असेल. कोणत्या दिशेने सरकार जाते, हे पाहू. आम्ही विरोधात आहोत. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जबाबदारी पार पाडेल. अजित पवार गटाबद्दल अत्यंत दुःख वाटते. त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.