Chandrapur Constituency : कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यानुसार शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने दिलेला आदेश आम्ही पाळणार आहोत. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा आम्ही प्रचार करू, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत आमदार धानोरकर यांच्याबाबत कोणतेही भाष्य करणे टाळले.
महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी आपण प्रचारासाठी जाणार आहे. विरोधी पक्षनेतेपदावर आहोत. त्यामुळे आपण महाराष्ट्राचे नेते आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच पक्षाचे काम करावे लागणार आहे, असे नमूद करीत त्यांनी चंद्रपुरात प्रचार करणार का? या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर देणे टाळून नेले. प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव घेणे टाळले. यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित गडबडीत त्या नाव घ्यायचे विसरल्या असतील, नाव घेणे जास्त महत्त्वाचे नाही, असे त्यांनी स्पष्ट करीत धानोरकर आणि आपल्यात कोणतेही पक्षांतर्गत वाद नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक कोणतीही असो उमेदवारी विजयी होत नसतो. जय-पराजय हा पक्षाचा असतो. त्यामुळे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. प्रतिभा धानोरकर यांचा उमदेवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारला असता, त्यावर थेट न बोलता ज्या- ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या ठिकाणी जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विदर्भातील पहिला टप्प्यातील रामटेक जर सोडला तर पाच पैकी चार ठिकाणी काँग्रेस सोबत थेट लढत होणार आहे. काँग्रेसला जिंकून देणार असे, विदर्भाने ठरवले आहे. काँग्रेस प्रचंड मतांनी विजयी होईल, आम्ही सर्व ठिकाणी सक्षम उमेदवार दिले असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे विदर्भ यावेळी देखील काँग्रेसला पूर्ण साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.