Harsh Decision : लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत विजय देवतळे आणि आसावरी देवतळे यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे आदेश दिले आहेत. देवतळे यांच्या विरोधात अनेकांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली होती. लोकसभा निवडणुकीत देवतळे यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर होता.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर चंद्रपुरातील काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी अनेक प्रकारच्या जबाबदारींचे वाटप केले होते. मात्र त्यातील काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याचा आरोप होता. अशाच प्रकारचे काम विजय देवतळे आणि आसावरी देवतळे यांनी केल्याचा आरोप स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत काँग्रेसने देवतळे यांच्या संदर्भात माहिती मागविली होती. तक्रार करणाऱ्यांनी देवतळे यांच्या विरोधातील काही पुरावे देखील प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पोहोचविल्याची माहिती आहे.
सहा वर्षांसाठी बाहेर
देवतळे दाम्पत्याविरोधात मिळालेली माहिती आणि तक्रारकर्त्यांनी सादर केलेले पुरावे पाहता प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी देवतळे दाम्पत्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी देवतळे यांना निलंबनाचे पत्र दिले. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनाही याबाबत प्रदेश काँग्रेसने कळविले आहे.
चंद्रपुरात काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. मात्र या स्पर्धेत प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारली. धानोरकर यांचा प्रचार सुरू असताना काहींनी पक्षादेशाच्या विरोधात काम केले. त्यात देवतळे दाम्पत्याचा समावेश असल्याची तक्रार झाली होती.
Maharashtra Assembly : लाडीगोडीचे अधिवेशन सर्वसामान्यांना काही देणार का?
देवतळे यांच्याविरोधात कारवाई झाल्यानंतर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमध्ये केवळ देवतळे दाम्पत्यच आहे की, आणखी काहींचा यात समावेश आहे याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने निवडणुकीत बाजी मारली असली तरी पक्षभेदींवर कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.