महाराष्ट्र

High Court : …तर सुनील केदार लढतील आगामी विधानसभा निवडणूक !

Sunil Kedar : केदारांसह सहा जणांना न्यायालयाने पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतरही केदार यांनी लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करून निवडणूक लढली. तेथे त्यांनी चांगली लढत दिली. आता आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. 

22 डिसेंबर 2023 रोजी केदारांसह सहा जणांना न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली. या निकालानंतर त्यांना पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नाही. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी या शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला आहे.

नागपूर खंडपीठात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास सुनील केदार यांना आगामी विधानसभा निवडणूक लढता येणार आहे. यावर्षी ऑक्टोबर किंवा फारच फार नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सुनील केदार यांच्या अर्जानंतर उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जाते.

ZP General Assembly : ‘या’ मुद्द्यावरून जाणार गुद्द्यांवर ?

सुनील केदार हे कॉंग्रेसचे हेवी वेट नेते आहेत. नागपूर जिल्ह्यातील त्यांच्या सावनेर या मतदारसंघात अपवाद वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी शिक्षा झाल्यानंतरही त्यांनी न थांबता काम सुरू ठेवले. रामटेक लोकसभा मतदारसंघात श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी मिळवून देऊन महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली.

लढवय्या नेता म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची ओळख आहे. नागपूर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता विधानसभा निवडणूक ते सहजासहजी हातची जाऊ देणार नाहीत, असे त्यांच्या हल्लीच्या हालचालींवरून दिसत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!