काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून बरेच महाभारत झाले. अखेर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात रिंगणात उतरत बंडखोरी केली. पर्यायाने पक्षाने त्यांना निलंबित केले. मात्र त्याच मुळकांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनिल केदार यांनी पुढाकार घेतला. तर बंडखोर मुळक हे उमरेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसून आले. एकूण स्थिती लक्षात घेता कॉंग्रेसमध्ये नेमके चालले काय आहे व कोण कुणाचे एकनिष्ठ आहे असाच सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे केदारांच्या उपस्थितीत झालेल्या मुळकांच्या सभेचे रेकॉर्डिंग हाय कमांडकडे पोहोचले आहे, असे बोलले जाते.
रामटेक मतदारसंघ महाविकास आघाडीत उद्धवसेनेला, तर उमरेड काँग्रेसला सुटला आहे. रामटेकमध्ये उद्धवसेनेचे विशाल बरबटे, तर उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम उमेदवार आहेत. बरबटे यांच्या विरोधात बंडखोरी करीत काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दंड थोपटले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले होते. त्यांनी कारवाईचाही इशारा दिला होता.
यानुसार रामटेक मतदारसंघात बंडखोरी करीत निवडणूक लढविणारे काँग्रेसचे राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, मुळक यांना विजयी करण्याचे आवाहन करीत सोमवारी रामटेक विधानसभा मतदारसंघात पदयात्रा आणि प्रचार सभा घेत रामटेकचे काँग्रेसचे खा. श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसलाच उघड चॅलेंज दिले आहे. इकडे काँग्रेसचे निलंबित जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उमरेड येथे सभा घेत काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या विजयाचा संकल्प केला.
त्यामुळे महाविकास आघाडीत राज्यस्तरावर काहीही निर्णय होत असले तरी मुळक, बर्वे आणि केदार यांच्या या भूमिकेमुळे रामटेक आणि उमरेडमध्ये चाललंय तरी काय, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून उमटत आहेत. याबाबत केदार यांनी भाष्य केले नसले तरी बर्वे यांनी मात्र त्यांची भूमिका मांडली. आमची निष्ठा काँग्रेसशी आहे. आम्ही विशाल बरबटेंशी कोणतीही गद्दारी केली नाही. रामटेकच्या लोकांनी सांगितले की मुळक यांच्याशिवाय येथे पर्याय नाही. त्यामुळे लोकभावनेचा आदर करीत आम्ही मुळक यांच्यासोबत आहोत. राजेंद्र मुळक हे जिंकून आल्यानंतर आमच्यासोबतच राहतील, असे बर्वे म्हणाले.