Rahul Gandhi In Maharashtra : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. लवकरच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन पार्टीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 20 ऑगस्टला राहुल मुंबईत येऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणू आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपली तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे देखील बैठकसत्र सुरू आहे. अशात राहुल महाराष्ट्रात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे सध्या काँग्रेसचे मनोबल उंच आहे. स्वबळावर राज्यातील सर्व 288 मतदारसंघात निवडणूक लढता येते का, याची चाचपणी देखील काँग्रेस करीत आहे. मात्र काँग्रेसचे सर्वच नेते तीनही पक्ष महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढतील असे सांगत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते जागा वाटपात सर्वाधिक जागांवर दावा करत आहेत. या संदर्भात देखील राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा शक्य
राहुल यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात काँग्रेसने किती जागांवर दावा करायचा हे ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतही या दौऱ्यात प्राथमिक चर्चा शक्य आहे. शिवसेनेला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री हवे आहेत. शरद पवार यांना मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असावे असे वाटत आहे. लोकसभेतील मतांचा टक्का आणि जागांची संख्या पाहता काँग्रेस बलवान दिसत आहे. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसचा दावा सगळ्यात प्रबळ मानला जात आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. राहुल यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर कोण बसेल हे नाव निश्चित होणार नाही. मात्र ही खुर्ची कोणत्या पक्षाकडे येऊ शकते, याचा संकेत मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे नाना पटोले स्पष्टपणे म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत काँग्रेस सहमत नसल्याचे स्पष्ट झाले होते. अशातच उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री पद मिळावे म्हणूनच ते दिल्ली वाऱ्या करीत असल्याची टीका भाजपने या निमित्ताने केली आहे.