ED Raid : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मध्यरात्रीनंतर केलेल्या एका ट्विटमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्यावर ईडीची धाड पडणार असल्याचे भाकित केले आहे. सरकारने धाड टाकण्याची पूर्ण तयारी केलेली असल्याचा दावाही त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे.
सरकारवर ‘चक्रव्युह’चे टीकास्त्र डागल्यानंतर राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे. ‘माझ्यावर आता ईडीची धाड टाकण्याची तयारी सुरु झाली आहे. याबद्दल मला ईडीच्या अंतर्गत सूत्रांनीच माहिती दिली आहे. तसे पाहता माझे संसदेतील चक्रव्युह वरील भाषण काही लोकांना आवडलेले दिसत नाही. त्यामुळे माझ्यावर धाड टाकण्याचे प्लानिंग सुरु झाले आहे,’ असे राहुल यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंसंकल्पावर बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. ‘देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण घाबरले आहेत. महाभारतातील युद्धात सहा जणांनी अभिमन्यूला मारले. आता नवे चक्रव्यूह तयार केले जात आहे. तेही चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे होते. त्या कमळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर घेऊन फिरतात,’ असे राहुल गांधी म्हणाले होते.
हे सला लोक
अभिमन्यूला द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी अश्या 6 जणांनी मारले. आजही चक्रव्यूहामध्ये 6 लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत, अशी जहरी टीका राहुल यांनी केली होती.
अपघाती हिंदू
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर संसदेतील वातावरण काही वेळासाठी तापले होते. यानंतर एनडीए सरकारने राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेपही घेतला. दुसऱ्या दिवशी अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना अपघाती हिंदू म्हणून त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती असल्याची टीका केली होती.
म्हणून धाड पडणार
चक्रव्यूहाचा संदर्भ घेऊन केलेल्या भाषणामुळे आपल्यावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईची शक्यता आहे. ईडीमधील काही सूत्रांनी आपल्यावर कारवाई होणार असल्याची माहिती दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ट्विटमध्ये काय आहे?
‘टू इन वन’ला माझं चक्रव्यूहावरील भाषण आवडलं नाही, हे जाहीर आहे. ‘ईडी’तील काही लोकांनी मला सांगितलं की, छापे टाकण्याची योजना बनविण्यात येत आहे. शर्टाच्या बाह्या मागे सारून मी ‘ईडी’ची वाट पाहत आहे. त्यांना माझ्याकडून चहा आणि बिस्कीट मिळेल, असं म्हणत राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे