Samvidhan Rally : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान हे केवळ एखादे पुस्तक नाही. देशातील प्रत्येकाला जगण्याचा मंत्र देणारा हा एक महाग्रंथ आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केले. बुधवारी (6 नोव्हेंबर) राहुल यांनी नागपुरात संविधान सन्मान परिषदेला संबोधित केले. रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संघ कार्यालयाजवळ असलेल्या या सभागृहातून राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.
गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजप व संघाच्या लोकांना संविधानावर समोरून टीका करता येत नाही. त्यामुळे ते त्याच्यावर लपून हल्ला करतात. हे लोक विकास, प्रगती व अर्थव्यवस्था आदी शब्दांमागे लपून येतात. पण त्यांचे उद्दीष्ट संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणे हेच आहे, असे ते म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर कोट्यवधी लोकांच्या वेदना मांडत होते. आंबेडकर व गांधींसारखे लोक स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्यांचे दुःख, वेदना व आवाज मांडायचे, असं राहुल गांधी म्हणाले.
प्रत्येक घटकाचा आवाज
बाबासाहेबांनी हे संविधान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बनवले. पण आता मला सांगा, या संविधानात महात्मा फुलेंचा आवाज नाही का? त्यात गौतम बुद्धांचा आवाज नाही का? त्यात बसव अण्णा यांचा आवाज नाही का? सावित्रीबाई फुले यांचा आवाज नाही का? आहे तर काँग्रेस याच संविधानाचे संरक्षण करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. संविधानात समानतेची भाषा आहे. त्यात सर्वांचा आदर करण्याचा उल्लेख आहे. पण आरएसएस व भाजपचे लोक यावर आक्रमण करतात. संविधान नसते तर निवडणूक आयोगासारख्या संस्थाही अस्तित्वात आल्या नसत्या. त्यामुळे संविधानच हटवले तर सर्वकाही नष्ट होईल, असंही राहुल गांधी म्हणाले.
आरएसएस संविधानावर थेट हल्ला करू शकत नाही. हे लोक विकास, प्रगती, अर्थव्यवस्था आदी वेगवेगळ्या शब्दांमागे लपून येतात. पण त्यांचे उद्दीष्ट या संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच आहे. हे लोक समोरून नव्हे तर मागून वार करतात. गांधी यांनी यावेळी जातनिहाय जनगणनेचाही मुद्दा उपस्थित केला. देशात 90 टक्के लोकांकडे अधिकारच नसतील, पैसा, धन नसेल, तर त्याला काहीच अर्थ नाही. पाच टक्के लोक देश चालवत आहेत. शेअर बाजार वधारला की या लोकांचा फायदा होतो. 16 लाख कोटी रुपये माफ केले गेले त्यावर कुणीही काहीही बोललं नाही. मी कर्नाटकात बोललो, असं राहुल गांधी यांनी नमूद केलं.
अदानी याने देशाला बुडविले
अदाणी एक लाख कोटी बुडवतात त्यांना देशभक्त म्हटलं जातं. एकाला डिफॉल्टर बनवलं जातं दुसऱ्याला व्यावसायिक म्हटलं जातं. शेतकरी तुरुंगात जातो आणि दुसरा अदाणीसारखा माणूस प्रायव्हेट जेटने परदेशात जातो. याला विकास म्हटलं जातं. जातीय जनगणना केल्याने भारतात सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. देशात कुणीही असो प्रत्येकाला समजेल आपल्या हाती किती पैसा आहे? किती हक्क आहे? मला खात्री आहे की जेव्हा हे होईल त्यात दलित, आदिवासी, मागास असे कुणीही देशाच्या पुंजीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग आहे, असं राहुल गांधी म्हणाले.