Chief Justice Dhananjay Chandrachud : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमबाबतही शंका व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. 100 टक्के व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी केली आहे. त्याचवेळी सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यास सहकार्य केले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण सातत्याने चंद्रचूड यांच्यावर आरोप करताना दिसून येत आहेत.
गेल्या अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फुट पडली. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी सुरू झाली. तर निवडणूक आयोगाने पक्षातून फुटलेल्या व्यक्तींना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. तर सेवानिवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावर सुनावणी घेतली. आता चंद्रचूड सेवानिवृत्त झाले. मात्र त्यावर अद्यापही निर्णय लागलेला नाही, याचा दाखला देत पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केले आहेत.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी शिवसेना व राष्ट्रवादीच्या हक्काबाबत सुनावणी पुढे ढकलत अडीच वर्षे बेकायदेशीर सरकार चालवण्यास एकप्रकारे त्यांनी मदत केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबला नसता तर राज्यात आज वेगळे चित्र दिसले असते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यास सहकार्य केले आहे, असे चव्हाण यांनी म्हटलं आहे.
चंद्रचूड यांना लोकशाही बळकट करण्याची संधी होती. मात्र त्यांनी सुवर्णसंधी गमावली. आता ते माजी सरन्यायाधीश आहेत. आम्हाला त्यांचा आदर आहे. त्यामुळे फार जास्त बोलत नाही. खरं म्हणजे त्यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले हेच सत्य आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
100 टक्के VVPAT ची मोजणी करा
‘या देशातील लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण काम करतोय. त्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालाय. विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. आणीबाणीबद्दल अनेकवेळा काँग्रेसने माफी मागितली आहे. या निवडणुकीत विरोधात वातावरण नव्हतं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होणार होता. निकाल लागल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. या देशात लोकशाही नांदतेय हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे,’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
माझा तो व्हिडिओ
‘माझा 2019 चा ईव्हीएमबद्दलचा जुना व्हिडीओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही, असं माझं मत त्यावेळी होतं. जगात असे मशीन कुठेही निवडणुकीसाठी वापरले जात नाही. त्यामुळे 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे झालं नाही तर संशय वाढणार आहे,’ असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.