Political News : मतदारांना सांगण्यासारखे काहीच नसले आणि कोणतेही विकास काम केलेले नसेल तर एखाद्या नेत्याला निवडणुकीच्या मतांसाठी काहीही करावे लागते. प्रसंगी निवडणूक जिंकण्यासाठी भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’ करावे लागते. लोकांचा आपल्याला प्रचंड पाठिंबा आहे, असे ‘फेक’ चित्रही प्रसंगी साकारावे लागते. असाच काहीसा केविलवाणा प्रकार काँग्रेसकडून पूर्व विदर्भात झाला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लवकरच होत आहे. राज्यातील काही प्रतिष्ठेच्या लढतींपैकी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची लढत एक आहे. एकीकडे काँग्रेसच्या अब्जाधीश आमदार प्रतिभा धानोरकर या रिंगणात आहेत. दुसरीकडे महायुतीचे सुधीर मुनगंटीवार हे त्यांना टक्कर देत आहेत. सुरुवातीपासूनच कोणती विकास कामे केली हे सांगण्यासारखे नसल्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात जातीय आधार घेण्याचा निर्णय केला. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार असताना सुद्धा काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना मुद्दाम रिंगणात उतरवले.
प्रतिभा धानोरकर यांच्या माध्यमातून जातीय फायदा घेता येईल असा काँग्रेसचा पुरेपूर प्लान होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे जातीय फायद्या सोबत आपल्याला या सहानुभूतीचाही नक्की लाभ मिळेल, हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने वडेट्टीवार यांना दुधातील माशी प्रमाणे बाजूला काढत प्रतिभा धानोरकर यांना पुढे केले. काँग्रेसने जसा प्लॅन केला होता, अगदी तशाच पद्धतीने भावनिक आणि जातीय आधारावर चंद्रपुरात प्रचाराला सुरुवात झाली. याला भाजपकडून चौख प्रत्युत्तर मिळाले.
Lok Sabha Election : प्रतिभा धानोरकर दिसताच कार्यक्रमात उडाला गोंधळ
विकासाचे मुद्दे
काँग्रेसच्या तुलनेत भाजपने प्रचार करताना फक्त आणि फक्त विकासाचे मुद्दे पुढे केले. आमदारकीची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचा कसा विकास केला याचे डिजिटल आणि व्हिडिओ पुरावेच सुधीर मुनगंटीवार आणि भाजपकडून मतदारांपर्यंत पोहोचले. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे वातावरण आणखी बदलले. आपल्या एका भाषणात सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, ते राज्याचे अर्थमंत्री होते. दिल्लीत खासदार म्हणून गेले तरी राज्याचा तिजोरी चा पासवर्ड आजही त्यांच्याकडे आहे. मुनगंटीवार जे बोलले ते काही खोटे नाही. पण यामुळे काँग्रेसच्या तंबूत घबराट निर्माण झाली. अशातच काँग्रेस सेवा दल च्या एका नेत्यांने केलेल्या प्रतापामुळे आता तर काँग्रेसची पार पोलखोल झाली आहे.
सत्कारात पाठिंब्याचा प्रयत्न
काँग्रेसने केलेल्या एका प्रतापामुळे या पक्षाकडून सातत्याने जातीय आधार कसा घेतला जात आहे हे सर्वांना कळले. काँग्रेस सेवादलचे सूर्यकांत खनके यांनी तेली समाजाचा एक कार्यक्रम घेतला आणि काँग्रेसचे पार हसू झाले. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेली बांधवांच्या सत्कारासाठी खनके यांनी एक ‘गेट टू गेदर’ ठेवले. या कार्यक्रमातच त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून टाकला. समाजातील कोणालाही विश्वासात न घेता झालेल्या या प्रकारामुळे अन्य तेली बांधव भडकले. आता तर भाजपने खनके यांच्यावर बनावट स्वाक्षऱ्या करून ‘फेक’ संस्था आणि ‘फेक’ पाठिंबा यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे.
नेमकी का आली वेळ?
खरंतर चंद्रपूर मध्ये काँग्रेसवर आलेली ही वेळ त्यांच्याच पापाचे परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच भाजपच्या एका कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यांने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी शब्द पाळला नाही, असा जाहीर आरोप केला. कदाचित बाळू धानोरकर यांनी शब्द दिलेला शब्द त्यांना ते या जगात नसल्याने पाळता आला नसावा. परंतु त्यांच्या अर्धांगिनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना बाळू धानोरकर यांचे सर्व शब्द पूर्ण करता आले असते. महाराष्ट्रात प्रदीर्घकाळपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते. मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा होता तरी या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच चलती होती. त्यामुळे खरंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर जिल्ह्यासाठी काय नसते करता आले, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
म्हणून पळवाट
आमदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस जवळ चंद्रपुरातील मतदारांना दाखवण्यासाठी कोणतीही विकास कामे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. विकास कामेच केली नसल्यामुळे त्याचे पुरावे ही सादर करता येत नाही. दुसरीकडे संपत्तीमध्ये ही प्रचंड वाढ झाली आहे. तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी एकदा केंद्रात भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसचा खासदार निवडून दिला आहे. त्यातून पदरी काय पडलं याचा विचार आता मतदार करीत आहेत. केंद्र तिसऱ्यांदा मोदींचे सरकार येणार असेल आणि महाराष्ट्रात महायुतीचा सरकार राहणार असेल तर विरोधी पक्षातल्या खासदार निवडून देऊन करायचे काय? या निर्णयापर्यंत कुठेतरी मतदार आलेले आहेत.
आता ही बाब लक्षात आल्यामुळे आणि विकास कामांचा पुरावा सादर करण्यासाठी काहीच नसल्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा जातीचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तेली समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न आता फसल्याचे दिसत आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस जातीचे राजकारण करते असा आरोप होतो. कधी मुस्लिम समाजाचा वापर, कधी दलितांचा आधार घेत काँग्रेसने सत्ता मिळवली, असा आरोप सातत्याने होतो. आताही काँग्रेस जात आधारित जनगणनेचाच मुद्दा प्रमुख करीत आहे.
जातीच्या आधारावर ब्रिटिशांनी आणि मोगलांनी भारतावर राज्य केले. अनेक वर्षांपर्यंत भारतीयांच्या चांबदड्या लोळवून त्यांनी आपलाच देश लुटला. मात्र आजही देशात जातीच्या आधारावरच प्रचार केला जात आहे. समाज कोणताही असो, त्याला रस्ते, वीज, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा आणि मूलभूत सुविधा हवे आहेत. विकास हेच प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. त्यामुळे कोणाला मतदान करायचे हे लोकांनी ठरवून ठेवले आहे. कोणी कितीही प्रचार किंवा अपप्रचार केला तरी, ईव्हीएमच्या कक्षात आल्यानंतर कोणाच्या नावा समोरील बटन दाबायचे हे मतदारांना चांगलेच कळते.