चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार वाद आता नवीन राहिलेला नाही. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागेवर दावा सांगत असताना धानोरकरांचा खुलेआम विरोध करताना चंद्रपूरकरांनी पाहिले आहे. धानोरकरांना उमेदवारी मिळू नये, म्हणून वडेट्टीवारांनी लावलेली फिल्डिंग सुद्धा सगळ्यांनीच पाहिली. परंतु या सगळ्याला प्रतिभा धानोरकर पुरून उरल्या आणि अखेरच्या क्षणी पती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर नैसर्गिक नियमाप्रमाणे ‘मला उमेदवारी मिळावी’ या तत्त्वावर त्यांनी आपली उमेदवारी अक्षरशः खेचून आणली. एवढेच नाही तर , त्यानंतर एक हाती लढा देत त्यांनी विजय देखील संपादन केला. त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा वाडेट्टीवारांची अनुपस्थिती ही कायमच चर्चेचा विषय होता .
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता थेट ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघामध्येच उमेदवार बदलण्याचे स्वप्न उराशी घेऊन त्यादृष्टीने बिजारोपण करण्यासाठी प्रतिभा धानोरकर सरसावल्या आहेत .
कुणबी अधिवेशनात रोवले बीज
अखिल कुणबी समाज मंडळ , कुणबी समाज संघर्ष समिती व कुणबी महिला मंडळाच्या वतीने ब्रह्मपुरी येथे रविवारी (ता.8) महाअधिवेशन घेण्यात आले . या अधिवेशनाला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार परिणय फुके उपस्थित होते . या अधिवेशनामध्येच खासदार धानोरकर यांनी ब्रह्मपुरी गडचिरोली विधानसभा मतदारसंघात इतर समाज बहुसंख्येने असूनही त्यांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व मात्र अल्पसंख्य समाजाचे लोक करीत आहेत . ही परंपरा बदलण्याची वेळ आता आली आहे, असे सूचक वक्तव्य करीत त्यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरच निशाणा साधला आहे.
टक्केवारी नुसार हिस्सेदारी वर जोर
ब्रह्मपुरी चिमूर या भागामध्ये कुणबी समाज मतदार बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ” जेवढी ज्यांची टक्केवारी तेवढी त्यांची हिस्सेदारी ” या नियमाप्रमाणे ब्रह्मपुरी येथे आता कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे बिजारोपण करीत खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवारांच्या वटवृक्षालाच सुरुंग लावला असल्याचे बोलले जात आहे.
परिणय फुके ही सरसावले
ब्रह्मपुरी येथे आयोजित कुणबी महाअधिवेशनाला उपस्थित राहत आमदार परिणय फुके हे सुद्धा आता प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत पुढे सरसावले आहेत. आमदार परिणय फुके यांनी सुद्धा भाजपच्या या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार द्यावा यासाठी आपण पक्षश्रेष्ठींना गळ घालणार आहोत. पक्ष कोणताही असो पण उमेदवार मात्र कुणबी समाजाचा असावा, असे म्हणत परिणय फुके यांनी सुद्धा खासदार धानोरकरांच्या सुरात सूर मिसळून येणारी विधानसभा ही तडाखेबंद फलंदाजीची होईल. यादृष्टीने मैदान तयार करण्याचे जणूकाही आदेशच स्थानिक कुणबी समाज बांधवांना दिले आहेत .
जातगणनेचा विषय ऐरणीवर असताना खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार परिणय फुके यांनी थेट आपल्याच पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्यावर साधलेले हे शरसंधान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच खडाजंगी माजवणार असे चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
थेट वडेट्टीवारांच्या होम पिचवर जाऊन धानोरकरांनी केलेली ही तडाखेबंद फलंदाजी पाहता आता मैदानावरील पंच व तिसरे पंच निवडणुकीच्या मैदानावर काय निर्णय घेतात, याकडे आता सर्व मतदार प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे .