Contempt Of Constitution : परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण शहरात हिंसक आंदोलन झाले. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. परभणीमधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते आमदार नितीन राऊत यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
परभणीमध्ये झालेल्या विटंबनेच्या घटनेनंतर पोलिसांनी दलित समाजातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर केला. अनेक आंदोलन शांततेने रस्ता रोको करीत असताना त्यांना चामडी लोळेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीचा नितीन राऊत यांनी निषेध व्यक्त केला आहे. दलित समाजातील नागरिकांना त्यांनी शांतता आणि संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
कायदेशीर लढा
परभणी आणि आतापर्यंत अन्य भागांमध्ये झालेल्या विटंबनेच्या घटनांचा समाचार राऊत यांनी घेतला आहे. या सर्व घटनांना कायदेशीर पद्धतीने हाताळावे लागणार आहे. मात्र यासाठी दलित समाजातील नागरिकांनी शांतता आणि संयम राखणे नितांत गरजेची आहे. सरकारकडून सातत्याने ललितांवर अत्याचार केले जात आहेत. परभणी मध्ये ज्या पद्धतीचे पोलिसांनी लाठीहल्ला केला, त्यावरून सरकारची मानसिकता स्पष्ट झाली आहे.
Vijay Wadettiwar : पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आंदोलन पेटले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला. मात्र सरकार हे कृत्य करणाऱ्याला मनोरुग्ण असे घोषित करून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा सर्व घटनांमध्ये आता कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. परभणीमधील घटनेनंतर काँग्रेसकडून सरकारवर टीका केली जात आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधला.
पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे परभणीमध्ये ही घटना घडल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर एवढा भीषण प्रकार घडला नसता असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी कडून नाही आरोपीला अटक करण्यासाठी 24 तासाची मुदत देण्यात आली आहे. अवमान करणाऱ्या विरुद्ध कारवाई न झाल्यास परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परभणीतील या घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. लवकरच नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची दाट शक्यता आहे.