Assembly Election : महाविकास आघाडीत सगळे सिस्टमॅटिक सुरू आहे. प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे. जिथे पक्षात निवडून येण्याची क्षमता आहे. त्याच ठिकाणी महाविकास आघाडीने पक्षांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला थोडा वेळ लागेल. या प्रक्रियेला एक दोन दिवस वेळ लागेल. परंतु जागावाटप योग्य पद्धतीने करण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सांगितले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपण दोन दिवसांत एकत्र येणार आहोत. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. त्यानुसार पहिली लिस्ट केव्हा जाहीर करायची, याची माहिती दसऱ्यानंतर देण्यात येणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकार सत्तेतून काढणे हा महाविकास आघाडीचा पहिला अजेंडा आहे. त्यामुळे जिथे ज्या पक्षाचे बळ असेल, त्या ठिकाणी त्याच पक्षाने लढाव. त्यासाठी प्रत्येक जागेवर बारकाईने अभ्यास करून जागावाटप करत आहोत. एखादी जागा सगळेच मागत आहेत, हा मुद्दा सर्वच पक्षात चालत आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) देखील हिच समस्या आहे. त्यामुळे हे चालतच राहणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.
अकार्यक्षम सरकार
राज्यातील सरकार अकार्यक्षम सरकार आहे. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रात मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता झाल्या आहेत. त्याचे काय? यावर सरकार म्हणाले की, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. बदलापूर प्रकरणानंतर राज्यात अत्याचार वाढत आहे. हे अत्याचार न थांबणारे आहेत. राज्यातील सरकारच अकार्यक्षम आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
पटोले पुढे म्हणाले की, बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला होता. या प्रकरणातील आरोपी कुठे आहेत? त्यांना का पकडले नाही? ज्या शाळेत हे प्रकरण घडले. त्या शाळेच्या ट्रस्टीवर गंभीर आरोप आहेत. तरीही त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. जर सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल, तर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल, अशी टीका पटोले त्यांनी सरकारवर केली.
बदलापूरवरून सवाल
बदलापूर प्रकरणातील प्रमुख आपटे अद्याप बेपत्ता आहे. महात्मा गांधींच्या हत्येमध्येही एक आपटे होता. बदलापूरमधील प्रकरणातही एक आपटे आहे. आपटे अद्यापही फरार आहे, असे नाना पटोले म्हणाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे मुठभर उद्योगपती मित्र आहेत. त्या उद्योगपतींना राज्याची तिजोरी लुटवूनन दिली जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेचे पैसे अडकून राहतात. निराधारच्या योजना, आदिवासींचे पैसे थांबले आहेत. शेड्युल कास्ट, ओबीसींसारख्या अनेक जातींचे पैसे थांबविले जात आहेत. राज्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबल्याचे नाना पटोले म्हणाले.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीदेखील आक्षेप घेतला. गडकरी यांनी स्वतः सांगितले की, लाडकी बहीण योजना राज्याच्या तिजोरीवर परिणाम टाकेल. काँग्रेसचे कर्नाटक, तेलंगणामध्ये योजना कायम आहे. त्याचे कारण काँग्रेस उद्योगपतींना पैसे देत नाही. त्यांचे घर भरण्याचे काम काँग्रेस करत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. जनतेच्याच खिशातील पैसे लुटले जात आहेत. लाडक्या बहिणींच्याच पर्समधून पैसे काढले जात आहेत. योजना आणल्यानंतर खायच्या तेलापासून किरण चे भाव वाढले आहेतख् असे पटोले म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलचेही भाव वाढले आहेत. एक रुपया दिला आणि दहा रुपये काढले जात आहेत. सरकारमध्ये नतभ्रष्ट भाऊ आहेत. भाजपचे आमदार स्वतः सांगतात की, मतं मिळविण्यासाठी ही योजना आम्ही सुरू केली आहे. हे सख्खे भाऊ नाहीत. हे वैरी भाऊ आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. देशातील सरकार हिंदूंचे आहे. राज्यातील सरकार देखील हिंदूंचे आहे, असे पोस्टर लावले गेले होते. हिंदूंना शिव्या देणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई केली, ते पाहात आहोत,असे नाना पटोले म्हणाले.