Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा वाद वाढणार की काय असे संकेत आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाबाबत मान्य नसेल तर त्यांनी जाहीर करावे, असे वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. दानवे यांच्या या वक्तव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. मी लहान माणसांसोबत बोलत नाही. आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत चर्चा केली आहे, असे पटोले म्हणाले. त्यामुळे त्यांनी दानवे यांना लहान माणूस संबोधले आहे.
लाखांदूर काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी हे विधान केले. नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील महायुती आणि केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. गरीबांच्या विरोधात आहे. लाखांदूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरे पडली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 250 मिलिमीटरवर पाऊस या भागात पडला आहे. पण याची सरकारने दखलसुद्धा घेतली नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
काय म्हणाले दानवे ?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चेहरा आश्वासक आहे. उद्धव ठाकरेंसारखा चेहरा महाविकास आघाडी व महायुती दोघांकडेही नाही. सर्वसामान्य कल्याणकारी सुराज्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येऊ शकते. त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा वाद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला हे मान्य नसेल तर त्यांनी तसे जाहीर करावे, असे वक्तव्य दानवे यांनी केले होते. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत सध्या बोलणे ठिक राहणार नाही, असेही अंबादास दानवे म्हणाले होते.
लोक धडा शिकवणार
नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार मस्तीमध्ये आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नाचे काहीही करायचे नाही. राज्याची तिजोरी कशाप्रकारे लुटता येईल, याकडेच सरकारचे लक्ष आहे. यावरच सध्या ते काम करत आहेत. त्यामुळे हे सरकार बदलायला वेळ लागणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये यांना लोकांनी धडा शिकवला. आता प्रतिक्षा आहे ती विधानसभा निवडणुकीची. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूक लांबीवर टाकली आहे. लोकांना बदल हवा आहे. महायुतीचे सरकार नक्की जाईल, असे नाना पटोले म्हणाले.
महिलांच्या अत्याचाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लक्ष दिले पाहिजे. कोलकत्ता येथील घटनेवर सुद्धा ते बोलत नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महिला अत्याचाराचा निषेध केला. गांधी हाथरस आणि मणिपूरला गेले होते. राहुल गांधी हे देशाच्या प्रत्येक समस्येवर लक्ष देणारे नेतृत्व आहे. पण नरेंद्र मोदी यांना यासाठीदेखील वेळ नसल्याची टीका आमदार नाना पटोले यांनी केली.