नागपुरात लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. भ्रष्टाचार झाला हे लोकांना कळले आहे. आज डेंग्यू, चिकन गुणिया या आजारांना लोकांना समोरे जावे लागत आहे. नागपूरचा विकास जगात गाजत आहे. त्यामुळे नागपूरचेच काय, तर राज्यभरातील लोक आता सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीत ट्रेलर दिसलेच. आता पूर्ण पिक्चर दिसणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले.
नागपुरात बुधवारी (ता. 14) नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही आणि पावसाळ्यात पाणी वाहून जायला जागा नाही. विकास कशाला म्हणायचा? हे सलग दुसऱे वर्ष आहे की, लोकांना वाचवण्यासाठी बोट लावाव्या लागल्या. असा विकास नकोय, असे आता लोक म्हणायला लागले आहे. याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना भोगावे लागणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असे विचारले असता, सरकारने महाराष्ट्र गुजरातमध्ये नेऊन गहाण ठेवला आहे. हा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न महत्वाचा नाही. मुख्यमंत्री कोण होणार, हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू. कॉंग्रेस यावर आता बोलणार नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे नाना पटोले म्हणाले.
गरीबांची घरे आमदारांना
म्हाडाची घरे आमदारांना दिली जात आहेत. नागपूरच्या विकासानंतर खोक्यांचे सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार जगात प्रसिद्ध आहे. असंविधानिक सरकार आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. आता गरीबांची घरे आमदारांना देऊन लुटण्याचे काम सुरू आहे. सामान्य गरीब लोक ही बाब विसरणार नाहीत. येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील. मग यांना पळता भूई थोडी होईल.
शासकीय व्यवस्था बगलबच्च्यांच्या हातात
सेबीच्या माध्यमातुन मोठा घोटाळा समोर आला आहे. मध्यमवर्गीय लोक बाजारात पैसे गुंतवतात. सामान्यांचा पैश्याची उधळपट्टी करत डाका टाकला जात आहे. हे भ्रष्ट सरकार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विचारले असता, आता लाडकी बहीणही या सरकारला वाचवू शकत नाही, असे नाना पटोले म्हणाले. देशाचा लिलाव झाला आहे. लाला किल्ला दिला आहे. बगलबच्च्यांना कंत्राटे देण्याचं काम सुरू आहे. शासकीय व्यवस्था बगलबच्च्यांच्या हातात देण्याचं काम राज्यकर्ते करत असल्याचा घणाघाती आरोप पटोले यांनी केला.
लाडकी बहीण नव्हे लाडकी खुर्ची
एकदा निवडणुका लावा कोणाला बुक्का पडेल, हे माहीत होऊन जाईल. महाराष्ट्राचा जनतेने निर्णय घेतला आहे. लोक महायुतीला सत्तेतून बाहेर काढतील. लाडकी बहीण नव्हे लाडक्या खुर्चीसाठी आटा पिटा सुरू आहे. पोलिस भरतीसाठी पावसात आमच्या बहिणी भिजत आहेत. रस्त्याचा कडेला झोपत आहेत. त्यावर सरकार काहीच करत नाही. लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना आहे.
शिक्षण व्यवस्थेचे तिन तेरा
शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पीएचडी करुन काय दिवे लावणार आहेत का? कशाला बोगस गिरी करावी? शिक्षण व्यवस्थेत सरकार अपयशी झाली आहे. शिक्षण व्यवस्थेचा व्यापार झाला आहे. मोफतच्या नावावर मलिदा खाणे सुरू आहे. कमिशनखोरी सुरू आहे आणि भाजप यात एक्सपर्ट आहे. आरोग्य व्यवस्थेतही बोगसगिरी सुरू आहे. ससून रुग्णालय याच उदाहरण असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.