Attack On Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालकांना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नेते कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात असुरक्षित नव्हते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात होते, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांची पोस्टिंग देखील एका चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे यासर्वांची जबाबदारी घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पेालिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला. आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने काम केले आहे. त्या अशा प्रकारामुळे अडचणीत सापडल्या होत्या, असेही पटोले म्हणाले.
अधिकाऱ्यांना शोभायला हवे
रश्मी शुक्ला यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना असे वागताना शोभायला हवे. पोलिस महासंचालक असताना या पूर्णतः भारतीय जनता पार्टीसाठी काम करीत आहेत. प्रमुख पदावर बसलेल्या अधिकारी या पद्धतीने वागत असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईलच. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या डीजी यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेऊन राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला.
तीन जणांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. त्यानंतरही हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. वाहन थांबताच हल्लेखोर फरार झालेत. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यामुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. भ्याड हल्ल्याला घाबरुन मी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या विचाराशी तडजोड करणार नाही, असे आव्हाड म्हणाले. वडील खासदार झाल्याने संभाजीराजेंच्या मनात आग आहे असे आव्हाड म्हणाले. विशाळगडावर झालेल्या घटनेनंतर स्वत: तुमच्या वडीलांनी म्हणजेच शाहू महाराजांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखे आहे. संभाजीराजेंवर आता मी अधिक द्वेषाने व त्वेषाने बोलणार, असे आव्हाड म्हणाले.