Winter Assembly Session : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा महायुती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलितांवर अत्याचार केले. सोमनाथ सूर्यवंशी या दलित युवकाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा महायुती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना आमदार पटोले यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी (17 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाअटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
बहिष्कारास्त्र उपसले
विधिमंडहाचे सभागृहाचे कामकाज सुरू होताच आमदार नाना पटोले यांनी परभणीतील पोलिस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासननिर्मित होते का? अशा प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
आमदार नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभेला वापरल्या नाहीत. त्यासाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या. ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत. सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरू आहे. यातून भाजपाची मानसिकता स्पष्ट होते. लोकशाही व्यवस्था संपवण्याची आरएसएसची जी मानसिकता आहे, त्यासाठीच ‘वन नेशन, नो इलेक्शन’ विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
Uddhav Thackeray : विस्तारानंतर आतिशबाजीपेक्षा नाराजीचे बॉम्ब
आरोपी मोकाट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. या घटनेचा महाविकास आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर महाविकासच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महायुती सुसाट, आरोपी मोकाट, अटक करा, अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे संविधानाच्या विटंबनाविरोधात लढाई लढत असलेल्या दलित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा मृत्यू झाला. शासनाने केलेली ही हत्या असल्याची, गंभीर टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.