महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याच्या आरोपांमुळे गाजलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या बदलीची सातत्याने मागणी केली जात होती. या बदलीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाचे स्वागत केले आहे. त्याचवेळी रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करायच्या असा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. ज्या पद्धतीने झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पोलीस महासंचालकांच्या तातडीने बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे रश्मी शुक्लांचीही बदली व्हायला हवी होती. मात्र शुक्ला यांच्या बदलीसाठी एवढे दिवस का लागले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.’
शुक्ला निवडणुकीच्या कामात नको
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाल्यानंतर त्या निवडणुकीच्या कुठल्याही कामांमध्ये राहायला नको, अशी आमची मागणी आहे. त्या रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या. त्यांनी विरोधकांचे फोन टॅप केले होते. त्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले होते. अशा अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवू नका, असे आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितले होते. तरी त्यांना दोन वर्षांचे अवैध एक्स्टेन्शन देऊन फडणवीस आणि शिंदे यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना डीजी म्हणून बसवून ठेवले. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, असे आरोपही नाना पटोले यांनी केलेत.
शुक्लांना घरी पाठवले पाहिजे
निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेतली, त्यासाठी आभारी आहोत. मात्र एवढा वेळ का लागला असा प्रश्न कायम आहे. त्यांना दोन वर्षांचे एक्स्टेन्शन दिले. त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे त्यांना घरी पाठवला पाहिजे. कारण राज्य सरकारची कृपा झाली तरी त्यांना निवडणुकीच्या कामात लावतील, अशी भीती आम्हाला आहे, असंही पटोले म्हणाले. शुक्ला पदावर बसल्या तेव्हापासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली होती. त्यांच्या जागी सीनियर आयपीएस अधिकाऱ्याचे पोस्टिंग व्हावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
जरांगेंबद्दल म्हणाले..
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा सोमवारी केली. त्यासंदर्भात विचारले असता नाना पटोले म्हणाले, ‘ही त्यांची भूमिका आहे. निवडणूक लढवणे सर्वांचा अधिकार आहे. काँग्रेसने त्या संदर्भात कुठलीही भूमिका मांडलेली नाही. जरांगे यांच्यावर दबाव होता की नाही याबद्दल तेच सांगू शकतील.’