Congress On BJP : महायुतीला निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही सरकार स्थापन करण्यासाठी वेळ घालवण्यात येत आहे. दिल्लीमधील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आपल्या मित्रांना फायदा द्यायचा आहे. हे मित्र म्हणजे अंबानी आणि अदानी आहेत. त्यांच्यासाठी जो फायद्याचा ठरेल असाच व्यक्ती मुख्यमंत्री केला जाईल. अशा नावावर एक मत करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने सरकार स्थापनेसाठी वेळ घालवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक घेण्यासाठी आयोगाने विनाकारण वेळ घालवला. जम्मू काश्मीर सोबत महाराष्ट्राची निवडणूक आयोगाला घेता आली नाही. जाणीवपूर्वक निवडणूक उशिरा घेण्यात आली. आता निवडणूक झाल्यानंतरही मुख्यमंत्र्याचे नाव का निश्चित होत नाही? असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी केला.
सामान्यांचे घेणेदेणे नाही
महायुतीला कधीच सामान्य माणसाबद्दल कळवा नव्हता. त्यांनी नेहमीच चुकीच्या पद्धतीने काम केले. शेतकरी, बेरोजगार, महिला आणि श्रमिक सरकार सत्तेवर येईल आणि आपल्या हिताची कामे होतील याची प्रतीक्षा करीत आहे. मात्र जोपर्यंत दिल्लीतील यांच्या आकांचे मित्र कोणापासून फायदा मिळतो यावर ठाम होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार नाही, असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला. लोकांनी महायुतीला मतदान केलेले नाही. त्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणावर महायुतीला यश कसं मिळालं, असा प्रश्न नागरिक विचारत असल्याचही पटोले म्हणाले.
दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. आता काँग्रेसची भूमिका ठाम झाली आहे. यापुढे ईव्हीएमवर निवडणूक होऊ द्यायची नाही, अशी भूमिका आता काँग्रेस घेणार असल्याचे पटोले म्हणाले. ईव्हीएमच्या विरोधात देशभरामध्ये व्यापक जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली.
महायुतीचे सर्वच घटक पक्ष या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत जोडो आंदोलनाच्या प्रमाणे व्यापक स्वरूपात हे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून प्रत्येक घराघरात जात ईव्हीएम संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आगामी काळात महाविकास आघाडी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध रस्त्यावर उतरलेली दिसणार आहे. ईव्हीएम मध्ये सातत्याने हॅकिंग करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ‘हौसले बुलंद’ होते. परंतु निवडणुकीच्या निकालामुळे सर्वच पक्षांना मोठा धक्का बसला आहे.