Congress On Front Foot : विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. अकोला, नागपूरसह राज्यभरामध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभा होणार आहेत. उपराजधानी नागपूर लवकरच राहुल गांधी यांची संविधान सभा होणार आहे. ही सभा उमेदवारांच्या प्रचारासाठी नसली तरी ती ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या हस्ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुंबईत करण्यात येणार आहे.
मुद्दे समाविष्ट
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आरक्षणासह अनेक मुद्दे समाविष्ट राहणार आहेत. त्यानंतर प्रत्येक विभागात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. नागपुरातील संविधान सभेनंतर पूर्व विदर्भात पुन्हा एकदा राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला शहरात राहुल गांधी यांची सभा व्हावी अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अकोला शहरासाठी काहीही करून राहुल गांधी यांनी वेळ द्यावा, असा आग्रह काँग्रेसकडून धरण्यात आला आहे.
महायुतीनंतर सभा
महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभांच्या तोडीला तोड म्हणून राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत. झारखंडच्या तुलनेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीला जास्त प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मोदींच्या सभानंतर काही मतदारसंघांमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे. आपल्या सभांमध्ये मोदी, शाह आणि योगी जे काही बोलतील त्याच्या नोंदी राहुल गांधी यांची टीम घेणार आहे. त्यानंतर या सर्व मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी राहुल गांधी भाषण करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यामुळे भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस सर्वच आघाड्यांवर प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विजयाची हमी असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. महायुतीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करा, अशी सूचनाच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील सर्वच नेते सध्या विरोध बाजूला ठेवून काम करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला झालेल्या जागा वाटपाची संख्या जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच काँग्रेसवर विजय खेचून आणण्याची मोठी जबाबदारी आहे.
उद्धव ठाकरे राहणार
राहुल गांधी यांच्या सभेसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील अकोला जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे दौरा करणार आहेत. त्यांच्या मदतीला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील राहणार आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रचार सभांचा धुरळा उडणार आहे. त्यातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर शाब्दिक बाण सोडताना दिसणार आहेत.