Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसने देखील या मुद्द्यावरून आता सरकावर टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. 27) पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
पटोले म्हणाले की, महायुतीचे सरकार महाभ्रष्ट सरकार आहे. सरकारमधील मंत्री प्रत्येक कामात कमिशनखोरी करीत आहेत. या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळाही सांभाळता येत नाही. त्यामुळे हे सरकार महाराजांच्या नावाचा गैरवापर करून जनतेला काय सांभाळणार, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे दोन्ही सरकारची मिलीभगत सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
सगळीच विकवाक
केंद्र आणि राज्यातील सरकारने प्रत्येक गोष्टीची विकवाक सुरू केली आहे. नफ्यात असलेल्या सरकारच्या कंपन्या विकण्यात येत आहेत. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहे. गिट्टी, मुरूम, डांबर यात कमिशन घेण्यात येत आहे. एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला घेण्यात येत आहे. जनतेचा पैसा ओरबाडून खाल्ला जात आहे. काँग्रेस सातत्याने या विषयावर बोलत आहे. मात्र सरकार हे सर्व केवळ विरोधकांचे आरोप असल्याचे सांगत आहे. सरकार आम्हाला हे आरोप सिद्ध करा असे म्हणत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटना अशा भ्रष्टाचाराला सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, असे पटोले म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपटे नावाच्या ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले त्याला असे पुतळे उभारण्याचा अनुभव नाही. प्रथमच कंत्राटदाराने असा पुतळा तयार केला. कोणताही अनुभव नसताना त्याला 236 कोटी रुपयांचे काम दिले. पाच कोटी रुपये सौंदर्य करणासाठी दिले. काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पुतळा पडला. आता राज्य सरकार जबाबदारीतून हात झटकत आहे. केंद्र सरकार आणि नौदलाकडे बोट दाखविण्यात येत आहे. मात्र पुतळ्याच्या आधार घेत जी इव्हेंटबाजी केली, त्यावेळी राज्याचे मंत्री उपस्थित होते, याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. असे हे अजब सरकार आहे. यातून सरकारची मानसिकता सिद्ध होते. अशा वक्तव्यातून या सरकारने सतत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानच केला आहे. पुतळ्याच्या मुद्द्यावर आपण राज्याच्या पोलिस महासंचालकांना (DGP) पत्र देणार आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.